पुण्यात बेमुदत; गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील कारवाईच्या निषेधार्थ संप
गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पुण्यातील एका रेडिओलॉजिस्टवर पालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज्यभरातील रेडिओलॉजी सेवा मंगळवारी बंद ठेवणार असल्याचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांच्या संघटनेने जाहीर केले. यात एका दिवसासाठी सोनोग्राफी, क्ष- किरण तपासणी, सीटी-स्कॅन व एमआरआय तपासण्या बंद राहणार असून बुधवारपासून पुण्यात सोनोग्राफी व क्ष-किरण तपासण्यांचा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र स्टेट ब्रँच ऑफ इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन’ (एमएसबी आयआरआयए) या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (पीसीपीएनडीटी) पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष जपे यांच्यावर पुणे पालिकेने ही कारवाई केली होती. यात ५ एप्रिल रोजी डॉ. जपे यांची सोनोग्राफी मशिन्स सील करण्यात आली होती. ही मशिन्स सोडण्यात यावीत, तसेच पालिकेतील ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यासाठीच्या समुचित प्राधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना हटवावे, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान, पालिकेतर्फे डॉ. जपे यांच्या विरोधात ३० मे रोजी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
‘आयआरआयए’ संघटनेचे पीसीपीएनडीटी समन्वयक डॉ. जिग्नेश ठक्कर म्हणाले,‘‘ठोस पुरावे नसताना ही कारवाई झाली आहे. ज्या गर्भाची सोनोग्राफी डॉ. जपे यांनी केली होती त्या गर्भास व्यंग होते. शिवाय, ज्या व्यक्तीस गर्भलिंगनिदान करायचे असेल ते त्याचा ‘एफ फॉर्म’ भरुन पुरावा का ठेवतील? डॉ. जपे यांची मशीन्स सील करताना घाई केली गेली आणि १५ दिवसांसाठी त्यांच्या केंद्राची नोंदणीही निलंबित केली. पुण्यातील डॉक्टर आता गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी करण्यास घाबरु लागले आहेत.’’
मात्र,पालिकेकडे या प्रकरणात पुरेसे पुरावे असून तपास व कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतरच डॉ. जपे यांच्या विरोधात खटला भरला आहे, असे डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

प्रकरण काय?
* डॉ. आशुतोष जपे यांनी एका महिलेची १९ फेब्रुवारी रोजी सोनोग्राफी केली होती. त्यात महिलेचा गर्भ २० आठवडे ५ दिवसांचा होता. तसेच या गर्भास व्यंग असल्याचे सोनोग्राफी अहवालात नमूद केले होते. परंतु डॉ. जपे यांनी पालिकेला मासिक अहवाल पाठवताना त्यांनी केलेल्या सर्व सोनोग्राफी ‘सामान्य’ (नॉर्मल) असल्याचे नमूद केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
* पालिकेने केलेल्या तिमाही तपासण्यांमध्येही डॉ. जपे यांच्या केंद्रात पीसीपीएनडीटी कायद्याच्या कागदपत्रांसंबंधीच्या त्रुटी आढळल्याचे पालिकेने सांगितले.
* याच महिलेची १७ फेब्रुवारीलाही दुसऱ्या एका सोनोग्राफी केंद्रात सोनोग्राफी झाली होती. पालिकेच्या माहितीनुसार या अहवालात गर्भ ‘नॉर्मल’ असल्याचे नमूद केले होते.
* यानंतर २५ फेब्रुवारीला पुण्यातील एका मोठय़ा रुग्णालयात या महिलेचा गर्भपात करण्यात आला. या महिलेच्या जबाबात गर्भपात झालेला गर्भ मुलीचा होता, असा उल्लेख आहे. या महिलेस पहिली मुलगीच आहे.
* अधिक दिवसांचा गर्भपात केल्याबाबत याच प्रकरणात मे मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीला देसाई यांच्यावर पालिकेने गुन्हा दाखल केला होता.