हापूसला भौगोलिक निर्देशांक मिळवण्यासाठी प्रयत्न

देवगड, रत्नागिरी हापूसप्रमाणेच जुन्नर हापूसला मोठी मागणी असते. जुन्नर हापूसची चव आणि प्रतवारीही रत्नागिरी हापूससारखी असते. या पाश्र्वभूमीवर जुन्नर हापूसला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी या भागातील शेतक ऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्नर हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, या बाबत त्यांनी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांना नुकतेच जुन्नर भागातील आंबा उत्पादक शेतक ऱ्यांच्या वतीने नुकतेच पत्र दिले आहे.

जुन्नर हापूसचा स्वतंत्र भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवण्यासाठी शास्त्रोक्त माहिती संकलित करावी लागणार आहे. ही माहिती संकलित केल्यानंतर याबाबत अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. राज्याच्या कृषी हवामान विभागानुसार प्रत्येक विभागातील फळ व पिकांचे वेगवेगळे वैशिष्टय़ आहे. कोकणातील हापूस आणि मराठवाडय़ातील केसर आंब्याच्या वाणाने नावलौकिक मिळवला आहे. देवगड, रत्नागिरीप्रमाणे जुन्नर हापूसला मोठी मागणी असते. जुन्नर भागातील हापूसला स्वतंत्र ओळख मिळवून देणे गरजेचे असल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले आहे.

जुन्नर हापूसला मुंबईतील ग्राहकांकडून मोठी मागणी असते. जुन्नर तालुक्यातील पश्चिम घाट भागातील शेतक ऱ्यांनी शंभर वर्षांपूर्वी हापूस आंब्याची लागवड केली होती. पश्चिम घाट भागातील येणेरे, काले, दातखिळवाडी, निरगुडे, राळेगण, बेलसर, शिंदे, कुसूर, माणिकडोह या गावांमधील शेतकरी हापूस आंब्याची लागवड करतात. या भागातील हवामान आंबा लागवडीसाठी पोषक तसेच अनुकूल आहे. त्यामुळे हापूसच्या तोडीच्या आंब्याचे उत्पादन या भागातील शेतक ऱ्यांकडून घेतले जाते.  यामुळे जन्नर हापूसला स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळवणे गरजेचे आहे.

शासनाच्या वतीने या भागातील हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादकांचे सर्वेक्षण करून शास्त्रोक्त माहिती संकलित करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात यावी, अशी मागणी आहे. जुन्नर हापूसला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने मुंबई आणि पुण्यात स्वतंत्र आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी यापूर्वी जाहीर केले होते. जुन्नर हापूसच्या निर्यातीसाठी सवलत देण्यात येणार असल्याचे पणन मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते.

जुन्नर हापूसला शंभर वर्षांची परंपरा!

जुन्नर हापूसला शंभर वर्षांची परंपरा आहे. देवगड, रत्नागिरी हापूसच्या बरोबरीने आम्ही जुन्नर हापूसची मुंबईतील बाजार आवारात विक्री करत आहोत. मुंबईतील बाजारपेठेत जुन्नर हापूसची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. कोकणातील हापूसएवढा दर जुन्नरमधील हापूसला हंगामात मिळतो. गुजरात आणि मराठवाडय़ातील केशर आंब्याला स्वतंत्र ओळख आहे. त्याप्रमाणे जुन्नरमधील हापूसला स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि फळ आडतदार संघटनेचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी केली आहे.