21 September 2020

News Flash

असंघटित कामगारांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या ‘बालशिक्षण मंच’ साठी स्वयंसेवक हवेत!

मार्केट यार्ड परिसरातील महर्षीनगर येथील असंघटीत कामगारांच्या मुलांना अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास व समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना येता यावे यासाठी ही संस्था काम करते.

| June 13, 2015 03:06 am

पुण्यातील असंघटीत कामगारांच्या मुलांसाठी अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकास यासाठी विनामूल्य काम करणाऱ्या ‘बालशिक्षण मंच’ या संस्थेस या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असून, अशा कामाची आवड असणाऱ्यांनी त्यात सहभागी होण्याची संधी आहे.
अमर पोळ हे या एनजीओचे संचालक आहेत. अमर पोळ हे के. सी. ठाकरे विद्यानिकेतनमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी जून २००६ मध्ये ‘बालशिक्षण मंच’ ची स्थापना केली. सध्या मार्केट यार्ड परिसरातील महर्षीनगर येथील असंघटीत कामगारांच्या मुलांना अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास व समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना येता यावे यासाठी ही संस्था काम करते.
आता मार्केटयार्ड परिसरातील औद्योगिक वसाहत, येरवडा येथील यशवंतनगर, हडपसर व कोंढवा येथे असे वर्ग सुरू करण्याची मागणी होते आहे. सध्या अमर पोळ हे एकटेच काम करत आहेत, मात्र वाढीव वर्गासाठी त्यांना कार्यकर्त्यांंची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता आहे. निवृत्त शिक्षक, आय. टी. क्षेत्रातील तरूण, शिकवण्याची आवड असणारे लोक अशा सर्वांना पोळ यांनी या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बालशिक्षण मंचातर्फे हे काम कोणताही मोबदला न घेता केले जाते, त्यासाठी आर्थिक अथवा वस्तुरूपात मदत करणाऱ्यांनाही त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
सध्या महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव प्राथमिक विद्यालयात वर्षभर संध्याकाळी ६.३० वाजता हा उपक्रम चालतो. यामध्ये चौथी ते १२ वी या इयत्तेतील मुले आहेत. विविध विषयांवरील पुस्तकांची पेटी, रविवारी खास खेळाचा तास, वर्षभर विविध शिबिरे, व्याख्याने, सहली, चित्रपट, करीअर मार्गदर्शन आदी उपक्रम राबवण्यात येतात. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात संस्थेत अभ्यास केलेले दोन विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्र्तीण झाले आहेत. आजपर्यंत सुमारे ३५० विद्यार्थ्यांना अमर पोळ यांनी मार्गदर्शन केले आहे. आज त्यातील काही विद्यार्थी बँकेत, विविध सामाजिक संस्था, विविध कंपन्यांत कार्यरत आहेत.
पोळ यांचे बालपण कामगार वस्तीतच गेले असल्याने तेथील समस्यांची त्यांना योग्य जाणीव आहे, त्यामुळेच हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला एका वस्तीत सुरू केलेला हा उपक्रम आता अन्य भागांतही सुरू करण्याची मागणी होते आहे. मात्र एकटय़ाला हे सर्व सांभाळणे जमणार नसल्याने इच्छुक व्यक्तींनी या कामात सहभागी होण्याचे आवाहन अमर यांनी केले आहे. ९३७३३२२०२४ हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 3:06 am

Web Title: amar pol bal shikshan manch market yard
Next Stories
1 पारपत्रासाठीची जन्मदाखल्याची अट अनाथ बालकांसाठी शिथिल
2 गजेंद्र चौहान ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष, विद्यार्थ्यांचा निषेध
3 सर, बैठकीला येताना महालेखापालांसाठी दहा हजार आणा!
Just Now!
X