एरव्ही धकाधकीच्या जीवनात न मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावत त्यांनी चक्क पावणेतीनशेहून अधिक रेखाचित्रे चितारली. खऱ्या अर्थानं आपल्यातील कलाकार त्यांना या टाळेबंदीच्या कालखंडात गवसला. करोनामुळं निर्माण झालेल्या नैराश्याच्या वातावरणात या व्यक्तीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.

ही कहाणी कोणा करोना योद्ध्याची नाही की सामाजिक कार्यकर्त्याची. ही गोष्ट आहे टाळेबंदीच्या काळात स्वत:मधील कलाकाराबरोबर पुन्हा एकदा मैत्री करणाऱ्या एका इंजिनिअरची व्यक्तीची, अर्थात सदानंद आपटे यांची. आपल्या व्यक्त कामामुळे पूर्वी मिळत नसलेला वेळ लॉकडाउनमुळे मिळाल्याने आपटे यांना आपला छंद जोपासता आला. मेकॅनिकल इंजिनिअर असलेले आपटे गेली दोन दशके उद्याोगामध्ये मनुष्यबळ विभागात काम करतात. चिंचवड येथील गॅप्सेट कंपनी या आपल्या व्यावसायिक संस्थेद्वारे व्यवस्थापन प्रशिक्षण आणि सल्लागार म्हणून ते काम करतात.

काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्नीचे छायाचित्र संगणकावर पाहिले. ते पाहून याचे रेखाचित्र का करू नये असा विचार आपटे यांच्या मनात आला. त्या छायाचित्रावरून पेन्सिलच्या माध्यमातून ब्लॅक अॅण्ड व्हाईट रेखाचित्र तयार केले. त्या एका रेखाचित्राने प्रेरणा दिली आणि हळूहळू या कलेमध्येच ते रमू लागले. लॉकडाउनच्या काळात त्यांनी चितारलेल्या चित्रांमध्ये निसर्गदृश्य, व्यक्तिचित्र, पशू-पक्ष्यांची चित्रे अशी विषयांची विविधता आहे. इतकेच काय काही अमूर्त कल्पनाही त्यांनी मूर्त स्वरूपात उतरवल्या आहेत.

छोट्या बाळाच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव चित्र पाहणाऱ्याला हसवू शकतात. गंभीर व्यक्तीला पाहिल्यावर घरातील वडिलधाऱ्यांची आठवण येते. उंचावरून वाहणाऱ्या धबधब्याचा गतिमान वेग पेन्सिलच्या फटकाखऱ्यातून सहज व्यक्त होतो. या कलेमुळे आपण लोकांना आनंद देऊ शकलो, अशी समाधानाची भावना ते व्यक्त करतात. सदानंद आपटे यांच्या चित्रकलेवर प्रकाश टाकणारी एक चित्रफित ‘सुश्री फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेतर्फे यु ट्युबच्या माध्यमातून प्रदर्शित केली आहे.