विमानतळ भूसंपादन, मेट्रो मार्गिका, भामा आसखेड प्रकल्पाचे उर्वरित काम लांबणीवर

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सरसकट बंदीमुळे शहरासह जिल्ह्य़ातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे थांबली आहेत. त्यामध्ये पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन, मेट्रो मार्गिका, भामा आसखेड प्रकल्पाचे उर्वरित काम, टेमघर धरण दुरुस्ती अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

शहरासह जिल्ह्य़ात अनेक प्रकल्पांची कामे सध्या सुरु आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून ते प्रगतिपथावर आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेतील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यान पाच किलोमीटर भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गासाठी टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगदा निर्मितीचे काम सुरु झाले आहे. शहरातील तिसरी मार्गिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या माती परीक्षणाचे काम सुरु होते. मात्र,ही सर्व कामे करोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आली आहेत. कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले आहे. महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत खोदाईची कामे सुरु होती. ती थांबवण्यात आली आहेत. भामा आसखेड प्रकल्पातून शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र, सरसकट बंदी लागू होण्याच्या काही दिवस आधी पुनर्वसन आणि भरपाईच्या मागणीबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम थांबवले होते. त्यावर प्रशासनाकडून चर्चा सुरु होती. महापालिकेच्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) फेरनिविदा मागवण्याचा निर्णय झाला असून ही प्रक्रिया रखडली आहे. नदीसुधार योजनेंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची कामेही थंडावली आहेत. या कामांना जायकाकडून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र, करोनामुळे त्यात प्रगती होऊ शकलेली नाही. पीएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणारा प्रत्येकी एक असे दोन वर्तुळाकार रस्त्यांची कामे प्रशासकीय पातळीवर असून सरसकट बंदीमुळे ती थांबली आहेत.

भूसंपादन प्रक्रियाही थांबवली

पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मार्च महिन्यात भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात केली होती. मात्र, करोनामुळे ही प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. तर, चांदणी चौक येथील दुमजली उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेलाही खीळ बसली आहे.