रुग्णवाहिकेच्या अवाजवी भाडेवसुलीचा पहिला गुन्हा दाखल

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: बिबवेवाडीतून केवळ सात किलोमीटर अंतरावरून एरंडवणे येथील एका रुग्णालयात करोनाबाधित रुग्ण आणण्यासाठी तब्बल आठ हजार रुपयांचे भाडे आकारणाऱ्या हडपसरमधील संजीवनी अ‍ॅम्ब्युलन्स सव्‍‌र्हिसेस विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित करण्यात आले असून, रुग्णवाहिका आणि प्रत्येक रुग्णालयांत  दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मनमानी भाडेवसुलीवरून दाखल झालेला हा  पहिलाच गुन्हा ठरला आहे.

आरटीओतील वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. बिबवेवाडीतील रुग्णालयातून एरंडवणे भागातील रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी आठ हजार भाडे आणि आणखी अकराशे रुपयांची मागणी करण्यात आली होती. २५ जूनला घडलेल्या घटनेनंतर संजीवनी अ‍ॅम्ब्युलन्स सव्‍‌र्हिसेसकडून  देण्यात आलेले देयक समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडेही याबाबत तक्रार केल्याने त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडून तक्रार देऊन रुग्णवाहिकेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वाहन हडपसर येथील मयूर पुस्तके यांच्या मालकीचे असून प्रादेशिक परिवहन विभागात त्याची नोंदणी ‘मोबाइल क्लिनिक व्हॅन’अशी होती. संजीवनी अ‍ॅम्ब्युलन्स सव्‍‌र्हिसेसने या गाडीचा वापर रुग्णवाहिका म्हणून केला.  परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारून रुग्णांचे नातेवाईक आणि शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लिटे तपास करत आहेत.

रुग्णवाहिकेचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याचे पालन रुग्णवाहिका सेवा देणाऱ्यांनी केले पाहिजे. करोनाचा संसर्ग वाढीस लागलेला असताना अवाजवी भाडे आकारल्यास रुग्णवाहिका सेवा देणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील.

– बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

दरपत्रकानुसारच रुग्णवाहिकेचे भाडे आकारणे आणि दरपत्रक हे सर्व रुग्णवाहिका,तसेच खासगी, शासकीय रुग्णालयात ठळकपणे लावणे बंधनकारक आहे. रुग्णवाहिकेसाठी दरपत्रकापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे त्याबाबत तक्रार केल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.

– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी