मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी विकसित केलेल्या जखम बरी करण्यासाठीच्या आयुर्वेदिक औषधी संमिश्रणाला अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे. गेली दहा वर्षे या संमिश्रणावर संशोधन सुरू होते.
‘एस हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटर’चे संचालक डॉ. पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये औषधी संमिश्रणाच्या संशोधनाबद्दलच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘कोणत्याही शस्त्रक्रियेची जखम नीट भरून आली नाही तर शस्त्रक्रियेचे फलित डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही समाधानकारक ठरत नाही. मधुमेही रुग्णांच्या पायांना होणाऱ्या जखमा किंवा भाजल्याच्या जखमाही नीट भरून येत नाहीत. अशा समस्यांवर हे औषधी संमिश्रण उपयुक्त ठरेल. आधुनिक वैद्यकशास्त्रात जखम भरून यावी यासाठीची संमिश्रणे आहेत, परंतु ती सामान्य जनतेला परवडण्यासारखी नाहीत. त्यामुळे मी पारंपरिक वैद्यकशास्त्राचा या दृष्टीने अभ्यास सुरू केला. आम्ही शोधून काढलेल्या उत्पादनावर गेली दहा वर्षे प्रयोग सुरू असून औषधाचे कमीतकमी किंवा शून्य दुष्परिणाम असावेत आणि ते सामान्यांना परवडण्याजोगे असावे असा उद्देश होता.’’
जखम लवकर बरी करणे, ती चिघळू न देणे आणि जखमेचा होणारा दाह कमी करणे हे गुणधर्म या औषधात असल्याचेही पाटणकर यांनी सांगितले. सध्या या औषधाला अन्न व औषध विभागाने देशात उत्पादन करण्याची मान्यता दिली असून औषधाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी त्याला मिळालेले पेटंट साहाय्यभूत ठरू शकेल, असेही या वेळी सांगण्यात आले.