मायक्रोसॉफ्ट या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीच्या नावाने अमेरिकन नागरिकांची संगणकीय माहिती (डाटा) मिळवून त्यांच्याकडून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या पुण्यातील सायबर भामटय़ांचे उद्योग पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने उघडकीस आणले. या प्रकरणी तीन तरुणांना गजाआड केले असून या भामटय़ांनी केलेल्या फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. पिनॅकल ब्रुक, बावधन), हरिष नारायणदास खुशलानी (वय २६) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, दोघे रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या भामटय़ांची नावे आहेत. आदित्य याचे शिक्षण संगणक शास्त्र शाखेत झाले असून तो काही वर्षांंपूवी एका बीपीओ कंपनीत कामाला होता. त्या अनुभवाच्या आधारे त्याने त्याचे मित्र हरिष आणि रितेश यांना हाताशी धरून बावधन येथील एका इमारतीत बीपीओ कंपनी सुरू केली. त्यानंतर या तिघांनी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. मायक्रोसॉफ्ट कंपनीतील कर्मचारी असल्याची बतावणी करण्यास सुरुवात केली. हा संपर्क व्हीओआयपी यंत्रणेद्वारे होत असल्याने अमेरिकन नागरिकांना संशय आला नाही. संगणकात व्हायरसने प्रवेश केला असल्याची बतावणी करून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या खात्यातून पैसे लंपास करायचे.
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला ही माहिती मिळाली. शुक्रवारी (६ फेब्रुवारी ) पोलिसांनी बावधनमधील बीपीओ कंपनीवर छापा टाकून तिघांना पकडले. अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक संजय ढेंगे, पवार, भोईटे, निंबाळकर, पोलीस कर्मचारी राजकुमार जाबा, उमेश शिंदे, किरण अब्दागिरे, नितीन चांदणे, अष्टिद्धr(२२४)वन कुमकर, कांबळे, जगताप, बनसोडे, सरिता वेताळ यांनी ही कामगिरी केली. दरम्यान न्यायालयाने तिघा आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.