अमेरिकन डॉलर हवे असल्याच्या बहाण्याने परदेशी चलन देणाऱ्या कंपनीतील व्यवस्थापकाचे अपहरण करून त्याच्याकडील सहा हजार डॉलर लुटण्याची घटना नुकतीच घडली. डॉलर लुटल्यानंतर या व्यवस्थापकाला सातारा जिल्ह्य़ात खंडाळा येथील घाटात सोडून देण्यात आले. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल आडाव (वय २९, रा. भैरोबा नाला, सोलापूर रस्ता) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी चलन देणारी के. के. फॉरेन्सिक या नावाची कंपनी फातिमानगर येथे असून, अडाव हे कंपनीचे व्यवस्थापक आहेत. सोमवारी सकाळी कंपनीच्या मोबाईवर साहिल नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. सहा हजार अमेरिकन डॉलर हवे असल्याचे त्याने सांगितले व ते घेऊन कात्रज चौकातच येण्यास सांगितले.
डॉलरबाबत आलेल्या मागणीनुसार आडाव कात्रज चौकात पोहोचले. कात्रज पोलीस चौकीजवळ ते थांबले असताना मोटारीतून चार अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी आडाव यांना मोटारीत बसण्यास सांगितले. आडाव यांनी जागेवरच डॉलर घेऊन पैसे देण्याची मागणी केली. मात्र, रस्त्यामध्ये पैशाचा व्यवहार करणे योग्य नसल्याचे सांगत चौघांनी आडाव यांना मोटारीत बसविले. मोटारीत बसल्यानंतर चौघांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवला व त्यांचे अपहरण केले. त्यानंतर सातारा जिल्ह्य़ातील खंडाळा घाटामध्ये नेऊन त्यांच्याकडील सहा हजार अमेरिकन डॉलर जबरदस्तीने काढून घेतले. पुण्यात आल्यानंतर आडाव यांनी याबाबतची माहिती कंपनीच्या मालकांना दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.