अमित शहा यांच्याकडून मोदींचे कौतुक
औद्योगिक उत्पादन, नोकरीच्या संधी आणि पायाभूत सुविधा यामध्ये अडकून पडलेल्या राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) संकल्पनेच्या तांत्रिकतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक आणि मानवी चेहरा दिला, असे मत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केले. कणखर नेतृत्व असलेले एकटे मोदी देशाला पुढे नेऊ शकत नाहीत. शंभर कोटी पावले त्यांच्या पावलाबरोबर पडतील तेव्हाच देशाचा सर्वागीण विकास होऊ शकेल, असे आवाहनही शहा यांनी केले.
शहर भाजपतर्फे प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत आयोजित महामेळाव्यात अमित शहा बोलत होते.
‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’, स्टँड अप इंडिया’, ‘वेक अप इंडिया’ आणि ‘मुद्रा बँक’ या पाच योजनांच्या माध्यमातून मोदी यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या कामामध्ये जोडून घेण्याचे अभियान सुरू केले आहे, असे सांगून शहा म्हणाले, अयोग्य सरकारे आणि चुकीची धोरणे यामुळे देशाचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही.
जेथे लोकांचे विचार थांबतात तेथून मोदी यांच्या विचारांची सुरुवात होते. दोन वर्षांच्या काळामध्ये एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण घडले नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेवर ‘स्टार्ट अप इंडिया’ योजना सुरू केली आहे. दलित, आदिवासी मुलांना ‘स्टँड अप इंडिया’चा लाभ मिळत आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून ३ कोटी ८० हजार युवकांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.
घरामध्ये शौचालय, जनधन योजनेच्या माध्यमातून घराघरांमध्ये बँक खाते, ग्रामीण भागातील घरांमध्ये गॅस सिलिंडर अशा योजनांद्वारे मोदी यांनी राष्ट्रीय सकल उत्पन्न संकल्पनेला सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा मानवी चेहरा दिला.
भाजप-आप कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध
एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचे पडसाद भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमात नाही, तर कार्यक्रमानंतर आम आदमी पक्षाच्या आंदोलनामध्ये उमटले. आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगले. तर, काँग्रेसतर्फे शहा यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. त्यामुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये काही काळ बाहतुकीची कोंडी झाली होती. एकनाथ खडसे यांचा केवळ राजीनामा घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यांच्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करीत आप कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये निदर्शने केली.