राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून असणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी गुप्ता आपल्या खुर्चीवरुन उठून हॉलबाहेर गेले.

पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पूजा चव्हाण प्रकरणी संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, पोस्ट मार्टम अहवाल नेमका काय आले आहे, यासारखे प्रश्न विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी गुप्ता हे हसतच आपल्या जागेवरुन उठले आणि हॉलबाहेर पडले. पूजा चव्हाण तपासासंदर्भातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता पुण्याचे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पत्रकार त्यांना काहीतरी माहिती द्या अशी विनंती करत असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करत गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेल्या हॉलमधून काढता पाय घेतला.

पूजाच्या चुलत आजीचं ठिय्या आंदोलन

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबधित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पूजा चव्हाण यांची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचं वानवडी पोलिस स्टेशन बाहेर रविवारी ठिय्या आंदोलन केलं होतं. तसेच जोपर्यंत मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

चित्रा वाघ यांनी पोलीस तपासावर उपस्थित केलेलं प्रश्न चिन्ह

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही शनिवारी या प्रकरणात  चौकशी करणाऱ्या पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारणा केली असता तिथल्या पोलिसांनी उडवाउडवीची आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. ‘तिथले वरीष्ठ पोलीस निरीक्षक लगड यांनी मला सांगितलं की पूजाच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केलेली नाही. आम्हाला वरीष्ठांकडून लेखी आदेश न आल्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली नाही. पोलिसांना FIR दाखल करण्यासाठी कोणाचे आदेश हवे आहेत? घटनेच्या १७ दिवसांनंतर देखील एफआयआर दाखल का केली जात नाही?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. “पूजा चव्हाणचा गर्भपात झाला, त्या दिवशी यवतमाळच्या त्या रुग्णालयात ड्युटीवर एक डॉक्टर होते. मात्र, त्यांच्या जागी त्या वेळी दुसरेच डॉक्टर आले आणि त्यांनी पूजा चव्हाणला गर्भपाताची ट्रीटमेंट दिली”, असा दावा चित्रा वाघ यांनी यावेळी केला होता.