डॉ. हिमांशू कुलकर्णी यांचे मत
भूगर्भातील पाणी की भूतलावरील पाणी या संज्ञांविषयी सर्वसामान्यांमध्ये गोंधळ आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जमिनीखाली पाणी दिसून येते. या जमिनीखालच्या पाण्यातूनच नदीला पाणी मिळत असते. ही नदीची उगमस्थाने दूषित होत चालली असून ही धोक्याची घंटा आहे, असे मत अ‍ॅक्वाडाम संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुणे विभाग आणि एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नॅशनल सॉलिड वेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमिया कुमार साहू यांना मंडळाचे माजी अध्यक्ष डी. टी. देवळे यांच्या हस्ते पर्यावरणभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी कुलकर्णी बोलत होते. क्लबचे अध्यक्ष नितीन देशपांडे, संस्थापक डॉ. किरण कुलकर्णी, अमोद घमंडे, गणेश शिरोडे, मुकुंद परदेशी या वेळी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, सध्या केवळ पाण्याचेच नव्हे तर स्वच्छ पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. कोण, किती आणि कसे पाणी वापरतो याचे प्रमाण निश्चित नसल्याने त्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर झाला
आहे.
८० टक्के ग्रामीण जनतेला भूगर्भातून पाणीपुरवठा होतो. शहरातील ५० टक्के पाणीपुरवठा हा भूजलावर अवलंबून आहे. तर ढोबळमानाने ६० ते ७० टक्के उद्योग हे भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत. अशी टक्केवारी असताना पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंताजनक आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे कारखाने, बांधकाम व्यवसाय कंपन्या, रुग्णालय आणि हॉटेल्स यांनाही स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये संजय कांबळे, वीरेंद्र चित्राव, किरण पुरंदरे, प्रकाश म्हस्के, पी. के. मिराशे, डॉ. वाय. बी. सोनटक्के, नंदकुमार गुरव, अजित कुडे, राहुल धडफळे यांच्यासह प्लास्ट इंडिया, पॅटपर्प, फोब्र्ज मार्शल, किलरेस्कर ऑइल इंजिन यांचा समावेश होता. नितीन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अमोद घमंडे यांनी सूत्रसंचालन केले.