औषधी गुणधर्मामुळे आवळ्याच्या मागणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत असून मार्केटयार्डातील घाऊक फळबाजारात आवळ्याची आवक सुरू झाली आहे. बाजारात एक किलो आवळ्याला २० ते ४० रुपये असा दर मिळत आहे. किरकोळ बाजारात एक किलो आवळ्याची ५० ते ६० रुपये या दराने विक्री होत आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात नगर जिल्ह्य़ातून आवळ्याची आवक सुरू झाली आहे. बाजारात दररोज २ ते ४ टनापर्यंत आवळ्याची आवक होत आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आवळ्याचा हंगाम सुरू होतो. डिसेंबर महिन्यापर्यंत आवळ्याचा हंगाम सुरू राहतो.

पुढील पंधरवडय़ात पुणे आणि नगर जिल्ह्य़ातून आवळ्याची आवक आणखी वाढेल. त्यानंतर दररोज बाजारात ७ ते ८ टन आवळ्याची आवक होईल, अशी माहिती मार्केटयार्डातील आवळ्याचे व्यापारी माउली आंबेकर यांनी दिली.

हंगामाच्या सुरुवातीला आवळ्याला चांगले दर मिळत आहेत तसेच प्रतवारीही उत्तम आहे. गेल्या काही वर्षांपासून आवळ्यावर प्रक्रिया करून उत्पादनांची निर्मिती करणारे उद्योग वाढले आहेत.

औषधी गुणधर्मामुळे आवळ्याला वर्षभर चांगली मागणी असते. आवळा कॅण्डी, आवळा सुपारी, ज्युस, मोरआवळा तसेच लोणच्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो, असे आंबेकर यांनी सांगितले.

एक किलो आवळ्याचे दर

किरकोळ बाजार- ५० ते ६० रुपये

घाऊक बाजार- २० ते ४० रुपये

आवळ्याची आवक वाढल्यानंतर दरात घट होईल. पुढील पंधरवडय़ात आवळ्याची आवक वाढेल. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने फळधारणा चांगली झाली आहे. पोषक वातावरणामुळे आवळ्याची प्रतही चांगली आहे.

– माउली आंबेकर, आवळा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, फळबाजार