राष्ट्रवादीत कुरबूर

पिंपरी : शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत सक्षम उमेदवार मिळत नव्हता, अशी परिस्थिती होती. आता उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पक्षप्रवेशानंतर शिरूरचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच निवडणुकीच्या प्रचाराला लागलेल्या माजी आमदार विलास लांडे यांचा हिरमोड झाला आहे. लांडे समर्थकांची अस्वस्थता भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच व्यक्त झाली. तेव्हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव सलग तीन वेळा निवडून आले असून यंदा ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह शिरूर पट्टय़ातील राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते लोकसभेसाठी उत्सुक नव्हते. तेव्हा अजित पवार यांनी शिरूर लढवण्याची आपली तयारी असल्याचे विधान केले. प्रत्यक्षात ते शिरूरच्या रिंगणात उतरणार नव्हतेच. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी झाल्यानंतर २००९ मध्ये आढळरावांच्या विरोधात लढलेल्या लांडे यांनाच रिंगणात उतरवण्याचे ठरले. सुरुवातीला नकार दर्शवणारे लांडे उशिराने तयार झाले आणि प्रचाराला लागले.

शरद पवार यांनी दरम्यानच्या काळात डॉ. कोल्हे यांना पक्षात आणले. मूळचे नारायणगावचे असलेल्या डॉ. कोल्हे यांच्या नावाची पहिल्या दिवसापासून शिरूरचे संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यामुळे लांडे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली. त्याचे पडसाद राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उमटले.

मेळाव्यात शिरूरसाठी लांडे यांच्या नावाचाच आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला. मेळाव्यात तशी जोरदार भाषणबाजी झाली. तसेच नेत्यांसमोर घोषणाबाजी झाली. अजित पवारांच्या भाषणावेळी अखंडपणे घोषणा सुरू राहिल्याने ते संतापले आणि आवाज बंद न केल्यास तिकीट कापण्याची तंबी त्यांनी दिली. त्यानंतरच गोंधळ थांबला.

आढळराव निष्क्रिय ठरले आहेत. राष्ट्रवादीचा उमेदवार येथून खात्रीने निवडून येऊ शकतो, असे सांगत उमेदवारीचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, तो सर्वाना मान्य करावा लागेल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.