प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे मत
नाटय़प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या, संगीत श्रवणाचा आनंद लुटणाऱ्या आणि साहित्याचे विश्लेषण करणाऱ्या मराठी माणसांची नृत्य आणि दृश्यकलेबाबत दैन्यावस्थाच आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. ‘डोळे आहेत, पण दृष्टी नाही’ अशीच मराठी रसिकांची अवस्था असून दृश्यकलांबाबत माहिती करून घेण्याची आसदेखील दिसत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे पालेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या ‘बॉम्बे स्कूल : आठवणीतले, अनुभवलेले’ या पुस्तकाला केशवराव कोठावळे पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलासमीक्षक संजीवनी खेर आणि प्रकाशनचे अशोक कोठावळे या वेळी उपस्थित होते.
चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक याआधी चित्रकार अशीच माझी ओळख आहे. पण, आपल्याकडे अभिनेत्याला मिळणाऱ्या वलयामुळे त्याच्या अन्य गोष्टी झाकोळल्या जातात, याचा अनुभव मी घेतला असल्याचे सांगून पालेकर म्हणाले,‘‘ दहा भारतीय चित्रकारांची नावे कोणालाही सांगता येत नाहीत. मग, पाच मराठी चित्रकारांची नावे सांगणे तर दूरचीच गोष्ट आहे. मराठी माणसाच्या रसिकतेचे भरभरून कौतुक सांगितले जाते, पण नृत्य आणि दृश्यकलेबाबतच्या माहितीची वानवाच आहे. यासंदर्भातील लेखन हे व्यक्तिचित्रण आणि स्मरणरंजनापलीकडे जात नाही. सुहास बहुळकर यांनी दृश्यकलेबाबतची कोशनिर्मिती केली आहे. आता बॉम्बे स्कूल ही त्यांनी घातलेली भर पहिल्या पावसाच्या सरीसारखी सुखद आहे. या पुस्तकातून बॉम्बे स्कूल आणि बंगाल स्कूल अशा दोन्ही परंपरांचा मागोवा घेतला आहे.’’
‘‘अमूर्त शैली परदेशातून आलेली म्हणून ती अभारतीय असा समज आपल्याकडे करून घेण्यात आला आहे. उलट यथार्थदर्शी आणि वास्तवदर्शी म्हणजे भारतीय असे आता गचांडी धरून पटवून दिले जात आहे. भारतीय चित्रकलेची प्रकृती सुदृढ आहे. पण, तिला रसिकाश्रय मिळण्याची आवश्यकता आहे,’’ असेही पालेकर यांनी सांगितले.
लक्षावधी रुपये देऊन आपण घर घेतो. पण, त्या घराची शोभा वाढविण्यासाठी पाच-दहा हजार रुपये खर्चून चित्र विकत घेत नाही, या वास्तवावर बहुळकर यांनी बोट ठेवले. पूर्वी दिनदर्शिकांवर उत्तम चित्रे असायची. मात्र, आता त्याची जागा भविष्य, पाककृती, संकष्टी चतुर्थीची शहरानुसार चंद्रोदयाची वेळ आणि रेल्वे वेळापत्रकाने घेतली आहे. मग, कलेची जाण वाढणार तरी कशी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दीनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षांत माझ्या पहिल्याच पुस्तकाला कोठावळे पुरस्कार मिळाला याचा आनंद होत असल्याचे सांगत बहुळकर यांनी पुस्तकाच्या लेखनामागची गोष्ट सांगितली. ‘‘महाराष्ट्राच्या कलेमध्ये बॉम्बे स्कूलने जे कलात्मक आणि आविष्कारात्मक बदल घडवून आणले त्याची रंजक कहाणी सुहास बहुळकर यांनी या पुस्तकाद्वारे मांडली आहे,’’ असे सांगून संजीवनी खेर यांनी पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड करण्यामागची भूमिका मांडली. अशोक कोठावळे यांनी आभार मानले.