06 December 2019

News Flash

निषेधाचे स्वातंत्र्य आहे की नाही?

अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचा सवाल

अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचा सवाल

देशात जे काही घडते आहे, त्याचा निषेध कशा पद्धतीने करायचा? निषेधाची मुभा किंवा स्वातंत्र्य आहे की नाही, हा प्रश्न या देशाचा सुसंस्कृत आणि सहिष्णू नागरिक म्हणून मला पडतो, असा उद्वेग ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी व्यक्त केला.

सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या विषयांबद्दल मी सातत्याने बोलत आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थेसंदर्भातील निर्णयांविषयीचे प्रश्न त्या व्यासपीठावर नाही, तर कोठे मांडायचे, असा सवालही पालेकर यांनी उपस्थित केला.

मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना पालेकर यांचे भाषण आयोजकांनी थांबवले. त्यामुळे कार्यक्रमाचा विषय सोडून सरकारच्या काही निर्णयांवर टीका करून पालेकर यांनी औचित्यभंग केल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यासंदर्भात पालेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी संध्या गोखले उपस्थित होत्या. वक्त्याला आमंत्रित करताना त्याने काय बोलले पाहिजे, याची मला कल्पना दिली नव्हती. त्यामुळे मी औचित्यभंग केला हा मुद्दाच उपस्थित होऊ शकत नाही, असे पालेकर म्हणाले. बरवे यांना अभिवादन करणारे हे संस्थेतील शेवटचे प्रदर्शन असल्याची माझी माहिती होती. त्यानंतर या वर्षभरात मेहली आणि सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन होणार होते. त्याच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या. मात्र, नव्या व्यवस्थापन समितीने ही दोन्ही प्रदर्शने रद्द केली. बरवे यांच्या निधनानंतर त्यांची आठवण काढण्यासाठी आम्हाला २४ वर्षे जावी लागली. एखाद्या कलाकाराला त्याच्या कारकीर्दीसाठी मानवंदना देणारे प्रदर्शन रद्द करणे, ही जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. त्याबद्दल मी बोललो तर औचित्यभंग कसा होतो, असा सवाल पालेकर यांनी केला. माझे भाषण सुरू असताना ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी मला थांबविले, त्याचा मला खेद वाटतो. ‘तुम्ही माझे भाषण सेन्सॉर करणार का,’ असा प्रश्न मी त्यांना विचारला, असे पालेकर म्हणाले. मला निमंत्रित केलेल्या संस्थेच्या क्युरेटर जेसल ठक्कर यांनी विनंती केल्यानंतर मी भाषण थांबविले. मात्र, श्रोत्यांमध्ये असलेल्या सुधीर पटवर्धन यांनी ‘अमोल, तू योग्य तेच बोललास’ असे म्हटले नाही,’ याची खंत वाटली, असेही त्यांनी सांगितले.

पालेकर म्हणाले..

  • नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट हे शासकीय कलादालन असल्याचे संस्थेच्या संचालकांनी मला सांगितले. पण, हे कलादालन आपण कररूपी दिलेल्या पैशांतूनच चालते. मग, तेथील निर्णयांबद्दल आवाज उठविण्यात गैर ते काय?
  • साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचा मुखवटा घालून निमूटपणे बसलेल्या तीन महिलांना पोलिसांनी मंडपाबाहेर घालवून दिले. त्याबद्दल संमेलनाच्या व्यासपीठावरून कोणी चकार शब्द का उच्चारला नाही?
  • सेन्सॉरशिपविरोधात आणि अभिव्यक्ती व आविष्कारस्वातंत्र्यासाठी मी लढतो आहे, पण सेन्सॉरशिपची अशी वेगवेगळी रूपे आपल्यासमोर येत आहेत. ती जाणवतात की नाही, हेच मी वारंवार बोलत आलो आहे.

First Published on February 11, 2019 12:12 am

Web Title: amol palekar speech cut off at mumbai event for criticising government
Just Now!
X