13 December 2017

News Flash

एक धागा सुखाचा..

पैठणीच्या वस्त्राचे कुर्ते किंवा टी-शर्ट केले तर कामाला जाणाऱ्या महिलांनाही ते परिधान करणे सोयीचे

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 21, 2017 2:36 AM

   हातमाग विणकामाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून सौदामिनी हँडलूमतर्फे पैठणी विणण्याचा अनुभव देणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांनी हातमाग यंत्रावर पैठणीचे धागे विणून गुरुवारी केले.

अमृता फडणवीस यांनी हातमागावर धागे विणले

‘एक धागा सुखाचा’ हे सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत ऐकताना हातमाग यंत्रावर कापड विणणारे राजा परांजपे चटकन डोळ्यांसमोर उभे राहतात. तशाच हातमाग यंत्रावर पैठणीचे धागे गुरुवारी विणले गेले. हे धागे विणणारी व्यक्ती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्धागिनी अमृता फडणवीस. विणकामाच्या कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून विणकाम महोत्सवामध्ये धागे विणत त्यांनी भविष्यात निर्मिल्या जाणाऱ्या पैठणीशी भावनिक नाते निर्माण झाल्याचे सांगितले.

सौदामिनी हँडलूमतर्फे आयोजित पैठणी विणण्याचा अनुभव देणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांनी हातमाग यंत्रावर धागे विणून केले. ओत म्हणजे उभा धागा आणि प्रोत म्हणजे आडवा धागा असे वस्त्र विणण्याचा अनुभव घेताना त्यांनी वैदिक काळातील सीरी म्हणजेच विणकर स्त्रीशी नाते जोडले. महापौर मुक्ता टिळक, संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुचेता परांजपे आणि सौदामिनी हँडलूमच्या अनघा घैसास या वेळी उपस्थित होत्या.

हातमागावर धागे विणताना आत्मिक आनंद झाला. लग्नाच्या वेळी आईने दिलेल्या पैठणीला स्पर्श केला तरी त्या पैठणीद्वारे आईचा स्पर्श आठवतो. मध्यंतरी आपल्याकडे इतर प्रकारच्या साडय़ांची विक्री सर्वाधिक होत होती. मात्र, आता महिला पुन्हा एकदा पैठणीकडे वळत असून पैठणीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. पूर्वी स्त्रिया पैठणी ही परंपरा म्हणून सणवाराला नेसत आणि पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून सुपूर्द करीत असत. ही माझी पैठणी मी आता मुलीला तिच्या लग्नाच्या वेळी सुपूर्द करेन. जे विणकर ही पैठणी विणतात त्यांना फाटके कपडे मिळता कामा नयेत. त्यांना चांगले दिवस आले पाहिजेत, अशी अपेक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

पूर्वीच्या महिला केवळ घरकाम करीत होत्या. आता प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे संपादन करताना पैठणी नेसून कामाच्या ठिकाणी वावरणे त्यांना शक्य होत नाही. मी पण, आता नियमितपणे पैठणी नेसत राहीन. पैठणीच्या वस्त्राचे कुर्ते किंवा टी-शर्ट केले तर कामाला जाणाऱ्या महिलांनाही ते परिधान करणे सोयीचे होईल.

त्यांनी वेळ दिला तरी पुरेसे..

राज्याच्या ‘होम मिनिस्टर’ने त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ला कधी एखादी पैठणी घेऊन दिली आहे का, असे पत्रकारांनी अमृता फडणवीस यांना विचारले. तेव्हा फडणवीस यांनी ‘त्यांनी वेळ दिला तरी पुरेसे आहे’, असे मिस्किल शैलीत उत्तर दिले.

सव्वाशे वर्षांपूर्वीची पैठणी

लोकमान्य टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची सव्वाशे वर्षांपूर्वीची पैठणी माझ्याकडे आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. या पैठणीला चांदीची तार असलेली किनार आहे. सव्वाशे वर्षे झाली तरी या

पैठणीचा एकही धागा इकडे-तिकडे झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. हातमागाचे कपडे इतके महाग का असतात हे मला आज समजले, अशी टिप्पणी मुक्ता टिळक यांनी केली.

First Published on April 21, 2017 2:31 am

Web Title: amrita fadnavis wee thread in handloom