शहरातील करोनाची स्थिती आटोक्यात; ९७ टक्के भागातील व्यवहार पूर्ववत

पुणे : येत्या जूनअखेपर्यंत शहरात करोनाचे ७५०० उपचार सुरू असलेले (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण असतील, असा अंदाज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी व्यक्त केला. शहरातील करोनाची स्थिती आटोक्यात येत असून सद्य:स्थितीत ९७ टक्के भागातील व्यवहार पूर्ववत करण्यात आले आहेत, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरात सामाजिक संसर्ग झाल्याचे गृहीत धरून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे महापालिका आयुक्त गायकवाड आणि विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. महापालिका आयुक्त गायकवाड म्हणाले, ‘एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शहरात रुग्ण दुपटीचे प्रमाण आठ दिवस होते. त्यानुसार मेअखेपर्यंत शहरात एकूण (बरे झालेल्या रुग्णांसह) दहा हजार रुग्ण असतील, असा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तवला होता. त्या दृष्टीने आम्ही खाटा, उपचारांसह इतर आवश्यक तयारी देखील केली होती. मात्र, प्रत्यक्षात सात हजार रुग्ण मेअखेपर्यंत शहरात होते. या पार्श्वभूमीवर शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात आहे.’

दरम्यान, शहरातील सध्याची करोनाची स्थिती पाहता जूनअखेपर्यंत ७५०० करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असतील. शहरात वर्षभरात होणाऱ्या मृत्यूपेक्षा करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. अशा सर्वेक्षणाच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता आठव्या फेरीअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दहा वर्षांखालील बालके आणि कर्करोग, मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब अशा व्याधी असणाऱ्या नागरिकांची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. तसेच टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रे वगळून ९७ टक्के भागातील व्यवहार पूर्ववत करण्यात आले आहेत, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पुण्यात सामाजिक संसर्ग झाल्याचे गृहीत धरून उपाययोजना

राज्यात मुंबईखालोखाल पुण्यातच करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात सामाजिक संसर्ग सुरू झाला आहे का? या प्रश्नावर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सामाजिक संसर्ग झाल्याचे गृहीत धरून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. केवळ संशयितांचीच करोना चाचणी करण्याचे आदेश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. तसेच लक्षणे नसलेल्या मात्र, करोना चाचणी सकारात्मक आलेल्यांवर घरीच उपचार करण्याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संबंधितांना करोना काळजी केंद्रातच ठेवण्यात येत आहे.