घरंदाज गायकीचा वारसा पुढे नेणारे प्रतिभावान गायक आनंद भाटे यांच्याशी आज, शुक्रवारी सांगीतिक गप्पांची मैफल रंगणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमातून या ‘आनंद गंधर्वा’शी रसिकांना संवाद साधता येईल. ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर हा वेबसंवाद फुलविणार आहेत.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची गायकी पुढे नेणारे कलाकार असा आनंद भाटे यांचा लौकिक. पंडितजींच्या घराणेदार तालमीने भाटे यांची गायकी विकसित झाली. गुरूकडून मिळालेल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या प्रतिभेची भर घालून कलाविष्कार करणाऱ्या आनंद भाटे यांच्या गायकीने रसिकांना आनंद दिला. भाटे यांच्या स्वरांतून अभिजात संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीतातील विविध प्रकार, भजन, अभंग, नाटय़पदे असे विविध रंग रसिकांनी अनुभवले आहेत.

नाटय़गीत आणि अभिनय..

संगीत रंगभूमीचे नटसम्राट बालगंधर्व यांची नाटय़पदे शालेय जीवनामध्ये सादर करणाऱ्या आनंद भाटे यांचा ‘आनंद गंधर्व’ या उपाधीने सन्मान करण्यात आला होता. बालगंधर्व यांच्यावरील चरित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावरील बालगंधर्व यांच्या नाटय़पदांना आनंद भाटे यांचा स्वर लाभला होता. उत्तम गायनाबरोबरच संगीत नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना आनंद दिला आहे.

सहभागी  होण्यासाठी.. https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_3July या लिंकवर नोंदणी आवश्यक.