माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचे प्रतिपादन

‘मी-टू’ आणि राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी पंतप्रधानांनी मौन सोडावे. या दोन्ही बाबत स्पष्ट भूमिका मांडणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्यसभा उपनेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सोमवारी केले. ‘मन की बात’ करणाऱ्या पंतप्रधानांनी ‘जन की बात करावी’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस भवनला आनंद शर्मा यांनी सोमवारी भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री उल्हास पवार, सचिव शमा मोहम्मद यावेळी उपस्थित होते. मी-टू, राफेल विमान खरेदी, स्ट्रॅटेजिक पॉलिसी या मुद्दय़ांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

ते म्हणाले की, मी-टू प्रकरणावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान बेटी बचाव बाबत चिंता व्यक्त करतात. मात्र मी-टू बाबत गप्प राहतात. याबाबत स्पष्ट भूमिका मांडणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करण्यात आली आहे. राफेल विमान खरेदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. करारासंदर्भातील फायलींवर प्रतिकूल शेरे मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सध्या बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे राफेल विमान खरेदी प्रकरणातील सर्व कागदपत्रे, फायली आणि इतिवृत्तांत सीलबंद केले पाहिजेत. तशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे काँग्रेस पक्ष करणार आहे.

स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे नेतृत्व कॅबिनेट सचिवांऐवजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही राजकीय नियुक्ती आहे अशी टीकाही त्यांनी व्यक्त केली.