सारंगीच्या साथीने रंगलेले पतियाळा आणि किराणा घराण्याचे गायन.. समेवर येताच कलाकाराला रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद.. मंत्रमुग्ध करणारे सतारवादन.. अशा उत्साही वातावरणात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शुक्रवारी रंग भरला. युवा कलाकारांचे या महोत्सवातील पदार्पण दिमाखात झाले. कलाकार आणि रसिकांमध्ये दुवा म्हणून गेली २५ वर्षे निवेदनाची कामगिरी उत्तमपणे बजावणारे आनंद देशमुख यांच्या सत्काराला टाळ्यांच्या कडकडाट झाला.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील दुसऱ्या सत्राचा प्रारंभ पतियाळा घराण्याच्या युवा गायिका सुचिस्मिता दास यांच्या गायनाने झाला. ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या शिष्येने पदार्पणातच आपल्या गायनाने रसिकांना मोहित केले. ‘शुद्ध सारंग’ रागानंतर त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांची ‘याद पियाकी आये’ ही लोकप्रिय ठुमरी सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली.
युवा गायक उस्ताद अमजद अली यांच्या गायनातून किराणा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े उलगडली. सुचिस्मिता दास यांच्याप्रमाणेच अमजद अली यांना उस्ताद दिलशाद खाँ यांनी सारंगीवादनाची साथ करून या दोन्ही मैफलीमध्ये अनोखा रंग भरला. ‘पूरिया धनाश्री’ आणि ‘बिहाग’ रागगायनानंतर ‘सावरियाँ करम न मान’ या ठुमरीने अमजद अली यांनी गायनाची सांगता केली.
एकाही शब्दाचा घोटाळा होऊ न देता स्वरांत भिजलेल्या आवाजात या महोत्सवाचे गेली २५ वर्षे निवेदन करणारे आनंद देशमुख यांचा आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त रामभाऊ जोशी यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देशमुख यांच्या सत्काराला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गायक नसलेल्या एका कलाकाराला मिळालेल्या टाळ्यांनी देशमुख भारावून गेले. ‘गेली २५ वर्षे माझी जागा ठरलेली होती. त्यामुळे आज स्वरमंचावर जाताना मनावर दडपण होते. हा सत्कार मी मायबाप रसिकांना अर्पण करतो,’ अशी भावना आनंद देशमुख यांनी व्यक्त केली. उत्तम प्रकृतीमुळे आणखी १२ वर्षांनी होणाऱ्या अमृमतहोत्सवी महोत्सवाला आपण उपस्थित असू, अशी इच्छा रामभाऊ जोशी यांनी प्रदर्शित केली.
नीलाद्री कुमार यांच्या सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘शुद्ध कल्याण’ रागाचा आलाप, जोड आणि झाला वादनानंतर त्यांनी विजय घाटे यांच्या तबलावादनाच्या साथीने या रागाचे सौंदर्य उलगडले. सतार आणि तबला जुगलबंदीचा प्रत्ययही रसिकांना आनंद देऊन गेला. मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मरतड पं. जसराज यांच्या गायनाने शुक्रवारच्या सत्राची सांगता झाली.

महोत्सवात आज (दुपारी ३)
– भारती प्रताप (गायन)
– रघुनंदन पणशीकर (गायन)
– प्रवीण गोडखिंडी (बासरी)
– राजेंद्र गंगाणी (कथकनृत्य)
– पं. उल्हास कशाळकर (गायन)