सामान्य माणसांची सुख-दु:खं, व्यथा-वेदना आणि कोंडमारा व्यंगचित्रांतून अभिव्यक्त करणाऱ्या आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ ला तीन प्रयत्नांच्या माध्यमातून मूर्तरूप देण्यामध्ये मला यश आले. ‘कॉमन मॅन’चे हे शिल्प प्रत्यक्षात साकारले गेले आणि ते पाहताना या कॉमन मॅनचे निर्माते आर. के. लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून मीच कृतार्थ झालो!

सिंबायोसिस संस्थेच्या आवारामध्ये साकारलेले ‘कॉमन मॅन’ हे शिल्प मी घडविले आहे. तुळशीबाग सार्वजनिक मंडळ आणि अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून गणपती सजावट करणारे कलाकार ही माझी यापूर्वीची ओळख! डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी हे शिल्प घडविण्याची टाकलेली जबाबदारी हे माझ्यासाठी खडतर शिवधनुष्य होते. मात्र, हा ‘कॉमन मॅन’ घडविण्यात यश आले आणि माझ्यासारखा ‘कॉमन मॅन’ या शिल्पामुळे एका रात्रीत ‘सेलिब्रिटी’ झाला. एका अर्थाने लक्ष्मण यांचा हा ‘कॉमन मॅन’ माझ्या कलाजीवनामध्ये ‘टर्निग पॉईंट’ ठरला. एका दिग्गज कलाकाराचे प्रेम मला अनुभवता आले.
एक दिवस मुजुमदारसरांनी दूरध्वनी करून मला बोलावून घेतले. त्यांच्यासमोर एक व्यक्ति बसली होती. पण, ते आर. के. लक्ष्मण आहेत हे मला माहीत नव्हते. ‘कॉमन मॅन’ चे शिल्प तुला करायचे आहे, असे मुजुमदार यांनी सांगितले तेव्हा मला एका बाजूला आनंदही झाला. तर, दुसऱ्या बाजूला मला हे जमेल का असे प्रारंभी वाटले होते. मी केलेले छोटे क्ले-मॉडेल पाहण्यासाठी लक्ष्मण आणि कमला लक्ष्मण धनकवडी येथील स्टुडिओमध्ये आले होते. प्रारंभी त्यांनी या मॉडेलचे कौतुक केले. मग, या कॉमन मॅनचा बूट, त्याच्या धोतराची घडी, अंगरखा, जाकीट आणि डोक्याचे केस कसे असावेत याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. एवढेच नाही तर त्यांनी क्ले म्हणजेच माती हातामध्ये घेऊन त्या शिल्पावर ठेवली. जणू एखादा पिता आपल्या अपत्याला प्रेमाने कुरवाळतो तसे. या मार्गदर्शनाने मी प्रभावित झालो आणि १५ दिवसांत दुसरे मॉडेल केले. ते पाहिल्यानंतर त्यांनी काही सुधारणा सुचविल्या.
मधल्या काळात हे शिल्प लक्ष्मण यांना हवे तसे घडत नाही हे पाहिल्यावर मुजुमदार यांनी आपण कलाकार बदलूयात का? असे विचारले होते. मात्र, हे शिल्प विवेकच करेल असे सांगत लक्ष्मण यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मला कॉमन मॅन साकारण्यामध्ये यश आले. हे शिल्प पाहताना लक्ष्मण यांनाही आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपविता आला नाही. या शिल्पाच्या घडणीमध्ये जवळपास सहा महिने लक्ष्मण यांचा सहवास आणि त्यांचे मार्गदर्शन लाभले. एक कलाकार प्रेमळ आणि भावनाशील असू शकतो याची जाणीव झाली. या शिल्पामुळे मी लक्ष्मण यांच्या घरातील एक सदस्य झालो.
लक्ष्मण स्वत: नास्तिक होते. लवून नमस्कार केलेला त्यांना आवडायचा नाही. पण, केवळ माझी विनंती आणि आग्रह याचा मान राखून ते शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या तुळशीबाग गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. एवढेच नव्हे तर लक्ष्मण दांपत्याने गणरायाची आरती केली होती.