आपला गौरवशाली इतिहास भावी पिढय़ांपर्यंत पोहोचविण्यासाठी किल्ले संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देऊ, असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी रविवारी दिले.
राज्य सरकारतर्फे नियुक्त करण्यात आलेली गड संवर्धन समिती आणि राज्य पुरातन वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्यातर्फे आयोजित पुणे विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, गड संवर्धन समितीचे प्रमुख पांडुरंग बलकवडे, समितीचे समन्वयक मिलिंद लेले, सदस्य प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी, राजेंद्र टिपरे आणि संकेत कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, इतिहासाने शिकविलेले धडे आपण गिरवले नाहीत तर भविष्यकाळ धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. किल्ले हे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. ते टिकविले तरच राष्ट्र टिकेल.
किल्ले संवर्धन करताना आपण नकळत त्या वास्तूचे नुकसान तर करीत नाही ना याची काळजी घेण्याचे आवाहन बलकवडे यांनी केले. किल्ल्यांच्या परिसरातील नागरिकांना रोजगार मिळणे तसेच पर्यटन आणि वन विभागाच्या सहकार्याने संवर्धनाचे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.