पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोच्या मार्गाचे खोदकाम सुरु आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले आहे. हे अवशेष किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असावेत असा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. चाचण्या आणि संशोधनानंतर या अवशेषांचा काळ शोधता आल्यास यापूर्वी पुण्याचा कधीच समोर न आलेल्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. बुधवारी हे कामगारांनी खोदकाम सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मीटर अंतरापासून प्राण्यांची हाडं सापडू लागली. त्यानंतर कामगारांनी काळजीपूर्वक खोदकाम करत अनेक अवशेष बाहेर काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> पुण्यातील मंडईमध्ये सापडलेल्या अवाढव्य हडांच्या अवशेषांचे थक्क करणारे फोटो

मंडई येथे सापडलेल्या हडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हडांपेक्षा मोठा आहे. प्रथम दर्शनी ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी ही हाडं सापडली त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी आज (गुरुवारी) भेट दिली आहे. या हडांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांचे रहस्य उलगडण्यास मदत होईल असं सांगितलं जातं आहे.

नक्की पाहा >> Pune Metro: पुण्याच्या पोटात नक्की चाललंय तरी काय?; पाहा खास फोटो

काही इतिहास तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दोनशे वर्षांपूर्वी सध्याचा मंडई परिसर हा मैदानी भाग होता. येथे सर्कशीचे तंबू लावले जायचे. त्यामुळे या हाडांचे नक्की वय काय आहे, ती कधीपासून येथे आहेत याचा शोध लागल्यानंतरच हाडांबद्दल ठोसपणे सांगता येईल असं सांगितलं जातं आहे. सध्या तरी ही हाडं पुरातत्वविभागाकडे सोपवण्यात आली आहेत. मात्र मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलेल्या या हाडांच्या आकारामुळे या हडांबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal fossils found during pune metro work svk 88 scsg
First published on: 26-11-2020 at 13:54 IST