बैलगाडा शर्यतींवर टाकण्यात आलेली बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी जिल्हय़ातील आमदारांनी शुक्रवारी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. प्राणी छळ प्रतिबंधाविषयीच्या राजपत्रातील यादीतून बैलाचा समावेश वगळण्यात यावा किंवा कायद्यात बदल करून बैलांचे प्रदर्शन व शर्यती पुन्हा सुरू कराव्यात, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदारांनी हे आंदोलन केले.
आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, राहुल कुल, सुरेश गोरे आणि बाबुराव पाचारणे यांनी सकाळी अकराच्या सुमारास विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केले. यासंदर्भातील विविध मुद्दय़ांचे फलक त्यांनी आपल्यासोबत आणले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी दिले. ४०० वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा आवडता छंद असून, उत्सवकाळात होणाऱ्या बैलगाडा र्शयतीचा वारसा जपण्यात यावा, अशी मागणी निवेदनात असून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी कायद्यात बदल करू, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झाला नाही, याकडे आमदारांनी लक्ष वेधले आहे.