पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला. उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल न केल्याने काकडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी फेटाळला.
अंकुश काकडे यांना कसब्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ‘ए’ व ‘बी’ फॉर्मसह त्यांचा अर्ज शनिवारी दाखल केला. मात्र अर्जाबरोबर द्यायचे शपथपत्र काकडे यांनी जोडले नव्हते. शपथपत्र तयार करून आणण्यासाठी काकडे बाहेर गेलेले असतानाच महापौर दत्ता धनकवडे तसेच विशाल तांबे, अप्पा रेणुसे हे दीपक मानकर यांचा ‘ए’ व ‘बी’ फॉर्म घेऊन आले आणि मानकर यांचा अर्ज राष्ट्रवादीकडून सादर करण्यात आला. हा अर्ज सादर झाल्याचे समजल्यानंतर काकडे यांनी शपथपत्र सादर केले नाही. याच मुद्द्यावर त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.