अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात ‘अमर फोटो स्टुडिओ’चा प्रयोग सुरू असताना घडलेला प्रकार

नाटकाचा प्रयोग अंतिम टप्प्यात आलेला असताना प्रेक्षागृहातील दिवा फुटून त्यातून बाहेर पडलेल्या ठिणग्या प्रेक्षकांच्या अंगावरच उडाल्याने घबराट उडाली. पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात शनिवारी ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाचा प्रयोग सुरू असताना हा प्रकार घडल्याने नाटय़गृहांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

साठे नाटय़गृहात शनिवारी अमर फोटो स्टुडिओ नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाच्या प्रयोगादरम्यान पाच-सहा वेळा विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला. प्रयोग अंतिम टप्प्यात आला असताना कलाकारांची ओळख सुरू होती त्याचवेळी विजेच्या अतिउच्च दाबामुळे प्रेक्षागृहातील एका दिव्याने पेट घेतला आणि त्यातून बाहेर पडलेल्या ठिणग्या चक्क प्रेक्षकांच्या अंगावर पडल्या. बेसावध असलेल्या प्रेक्षकांमध्ये घबराट उडाली आणि दिव्याखालच्या प्रेक्षकांना तेथून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

या प्रकारामुळे आम्हा कलाकारांना भीती आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांची काळजी वाटू लागली आहे, अशी भावना अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केली. यापूर्वी एकदा तर अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात प्रयोग सुरू असताना चक्क ‘स्पॉट लाईट’च आमच्या पुढय़ात येऊन पडला होता. असे प्रकार वारंवार घडू लागल्यामुळे रंगमंदिरांच्या व्यवस्थापन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असते, याकडे त्याने लक्ष वेधले. वातानुकूलन यंत्रणा, ध्वनियंत्रणा आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता असे प्रत्येक नाटय़गृहाचे काही ना काही प्रश्न आहेत.

टिळक स्मारक मंदिरामध्ये प्रयोग करताना बाल्कनीतील प्रेक्षकांना स्पष्टपणे संवाद ऐकायला येत नाहीत अशी तक्रार आहे. त्यामुळे तेथील प्रयोगाला आम्ही आमची ध्वनियंत्रणा वापरतो, असेही अमेय वाघ याने सांगितले.