अमूल्य असे साहित्य निर्माण करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे फक्त जातीमुळेच आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे, असे मत मराठी भाषेचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य परिषद आयोजित अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘अण्णा भाऊ साठे प्रणीत समाजक्रांती’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, सम्यक साहित्य परिषदेचे दुयरेधन अहिरे आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, की अण्णा भाऊंचे सर्व साहित्य हे माणूसकेंद्री असे आहे, सामान्य माणसाचे दु:ख नेमकेपणाने मांडण्यात अण्णा भाऊ यशस्वी ठरतात, त्यांचे साहित्य वाचल्यावर आपण विचारप्रवृत्त होतो. मात्र एवढा श्रेष्ठ साहित्यिक केवळ जातीमुळे ज्ञानपीठसारख्या पुरस्कारापासून वंचित राहतो.
अण्णा भाऊ साठे व भालचंद्र नेमाडे हे दोघे समकालीन आहेत. त्यांच्या साहित्याचा विचार करता अण्णा भाऊंचेच साहित्य श्रेष्ठ आहे. ‘फकिरा’ या कादंबरीच्या माध्यमातून अण्णा भाऊंनी महाराष्ट्रातील संपूर्ण सांस्कृतिक विश्व ढवळून काढले. त्यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे भान होते, मात्र आजच्या साहित्यिकांमध्ये ते भान असल्याचे आढळत नाही. अण्णा भाऊंनी कधीही जातीचा संकुचित विचार केला नाही. आज काही लोक त्यांना केवळ मातंग समाजापुरताच मर्यादित ठेवू पाहत आहेत, त्यात केवळ त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. महापुरुषांना जातीत अडकवणे हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.