सध्याचे राजकारण जातीपाती व धर्म याच्यातच गुरफटलेले आहे. नखावरची शाई म्हणजेच लोकशाही, हाच आता लोकशाहीचा अर्थ समजला जातो. मात्र, त्या पलीकडेही जाऊन लोकशाहीचा अर्थ समजावून घेतला पाहिजे, असे मत ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार’ शिंदे यांना रविवारी रिपब्किलन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी शिंदे बोलत होते. २५ हजार रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महापौर चंचला कोद्रे, शिवसेनेचे पुणे शहर व जिल्हा संपर्कनेते गजानन कीर्तीकर, उपमहापौर सुनील गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख शाम देशपांडे, परिषदेचे अध्यक्ष हनुमंत साठे त्या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, आज राजकीय भेसळ सर्वत्र पहायला मिळते. लोकशाही म्हणजे केवळ तुमच्या- आमच्या नखावरील शाई म्हणून राहिली आहे. त्या पलीकडे जाऊन लोकशाहीकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. पक्षात काम करणाऱ्या नेत्यांपेक्षा जनतेवर प्रेम करणारे नेते महत्त्वाचे असतात. विस्तवात बंड उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते. मात्र, आता तसे दिसत नाही. माणुसकीसाठी विद्रोह झाला पाहिजे.
लहुजी वस्ताद यांच्याबाबत ते म्हणाले की, लहुजी वस्ताद हे वस्तादांचे वस्ताद होते. त्यांनी अनेक क्रांतिवीरांना शस्त्राचे कौशल्य शिकविले. त्यांचा इतिहास आपल्याला नव्याने लिहावा लागेल.
आठवले म्हणाले की, मातंग समाज आता जागा होत आहे. मातंग समाजाला शिक्षणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. महार व मातंग समाज एकत्र आला पाहिजे. त्याबरोबरच दलित सवर्ण दरी दूर झाली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहेत. लहुजी वस्ताद साळवी यांचे पुण्यात स्मारक व्हावे व त्यासाठी शासनाने एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही आठवले यांनी केली.