अण्णा हजारे यांची टिप्पणी

देशहितासाठी केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय चांगला असून, त्याचे परिणाम दिसायला सहा महिने द्यावे लागतील. मात्र, नोटाबंदीचा निर्णय योग्य नसल्याचे ध्यानात आले तर पुन्हा एकदा रामलीला मैदानावर आंदोलनासाठी बसायला मी मोकळा आहे, अशी टिप्पणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.

[jwplayer dxIMjswX]

नोटाबंदीच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी टीका केली आहे हे निदर्शनास आणून देताच ‘कोण काय बोलतंय त्याला मी फारसे महत्त्व देत नाही’, असे अण्णा म्हणाले.

ज्या रंगाचा चष्मा घातला असेल त्याला तोच रंग दिसणार, अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांचे हाल होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता हजारे म्हणाले, अधिक मूल्य असलेल्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चांगला असून, मी त्याचे समर्थन केले आहे. एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी तंतोतंत होईल असे नाही. काही लोकांना त्रास जरूर होईल, पण दु:खाची दरी ओलांडल्याखेरीज सुखाची हिरवळ दिसत नाही. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम दिसायला किमान सहा महिने दिले पाहिजेत. हा निर्णय योग्य नसल्याचे ध्यानात आले तर पुन्हा एकदा रामलीला मैदानावर बसायला मी मोकळा आहे.

एकीकडे अण्णा हजारे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले असले तरी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र या विषयावर बोलण्यास नकार दिला. साहित्याच्या कार्यक्रमाला राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आलो आहे, त्यामुळे राजकारणावरील प्रश्न नकोत, असेच त्यांनी सांगितले.

[jwplayer VwmkQGEJ]