एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील अंतर दिवसेंदिवस रुंदावत चालले आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या. पण त्यांनी अपेक्षाभंग केल्यामुळे मला तीव्र दुःख झाले असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले माजी मंत्री संदीप कुमार यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी ही भावना व्यक्त केली.
अण्णा हजारे म्हणाले, सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर राजकारणाला आणि राज्यकर्त्यांना नवी दिशा देण्याचे काम अरविंद केजरीवाल करेल, असे मला वाटले होते. त्याच्याकडे मी खूप अपेक्षेने बघत होतो. पण दिल्लीतील आपच्या मंत्र्यांची एकमागून एक प्रकरणे बाहेर येत आहेत. एकजण सीडी प्रकरणात अडकला तर दुसरा आणखी कोणत्या प्रकरणात अडकला आहे. हे सर्व बघून अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केल्याचे मला वाटते आहे. यामुळे मला खूप दुःख झाले आहे. अरविंद केजरीवाल यांनी स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींनाच राजकारणात संधी द्यायला हवी होती. पण तसे घडल्याचे दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
एका महिलेसोबत संदीप कुमार आक्षेपार्ह कृत्य करत असल्याचे सीडीमधून दिसते. व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेने शनिवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. संदीप कुमार यांनी रेशनकार्ड देण्याचे आमिष दाखवून माझे लैंगिक शोषण केले, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला. त्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी ही भूमिका मांडली. अण्णांच्या वक्तव्यानंतर अरविंद केजरीवाल काय म्हणतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.