भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. गेल्या वेळी त्यांनी आमचे उमेदवार पळवले आणि आमच्याच विरोधात उभे केले होते. या वेळी आम्ही काटय़ाने काटा काढण्याची रणनीती राबवू, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी काळेवाडीत केले. फडणवीस सरकारमुळे राज्य कर्जबाजारी झाले. टोलमुक्ती करू, यासारख्या फसव्या घोषणा करत त्यांनी सतत जनतेची दिशाभूल केली, अशी टीकाही पवारांनी केली.

शहरातील तीनही विधानसभा मतदार संघांतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. अमोल मिटकरी, संजोग वाघेरे, विलास लांडे, अण्णा बनसोडे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले,  भाजप-शिवसेनेची युती होणारच आहे. भाजपशी युती करण्याशिवाय शिवसेनेला गत्यंतर नाही. पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. ते भाजपला नमवत होते. आता उलट परिस्थिती आहे. आमचे अनेक जण पक्ष सोडून चालले आहेत. तरी आम्ही डगमगलो नाही. अजूनही काही जण जातील. त्यांनी खुशाल जावे. आमचे कार्यकर्ते सक्षम असल्याने आम्हाला कोणाची भीती नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यास मात्र पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही. लोकसभेच्या पराभवामुळे दु:ख झाले. मात्र, विधानसभेचे चित्र वेगळे असेल.

अजित पवार म्हणाले,

*   मंदी कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या सवलतींचा परिणाम विकासकामांवर होईल.

*  कंपन्यांच्या खासगीकरणाचा फायदा अंबानी, अदानी यांनाच

*   भाजप सरकारच्या काळात सवर्ण-मागासवर्गीय तणाव वाढला

*   पश्चिम महाराष्ट्राची अवहेलना, प्रश्न मांडायला मंत्रीच नाहीत.

*   वंचित आघाडीमुळे लोकसभेच्या १३ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका

*   धनंजय मुंडे यांनी सरकारचे अनेक गैरकारभार चव्हाटय़ावर आणले. सरकारने मात्र कोणतीच कारवाई केली नाही.