महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्वबळाची चाचपणी करताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने इच्छुकांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या. आता उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्याची वेळ आली. मात्र या प्रक्रियेच्या तोंडावर ‘युती’ आणि ‘आघाडी’ची चर्चा सुरु झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून या चर्चेच्या फेऱ्यांमुळे उमेदवारांच्या यादीची घोषणाही लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागा वाटपाचे सूत्र निश्चित होऊन आघाडी किंवा युती झाली तर अनेकांचे उमेदवारी मिळविण्याचे मनसुबेही धुळीस मिळणार आहेत. त्यामुळे सध्या तरी युती किंवा आघाडी नकोच, अशीच मागणी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना युती अधिकृतरीत्या तुटली. राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला, तर आघाडी तुटल्यानंतरही पुणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिली. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरही या घटनांचे पडसाद दिसून आले. त्यामुळे निवडणुकीचे पडघम सुरू होताच शिवसेना आणि काँग्रेसकडून स्वबळाची भाषा सुरु झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असलेल्या निवडणुकीमुळे तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे स्वबळावरच निवडणूक लढवावी, अशी मागणी सुरु झाली.

या पाश्र्वभूमीवर सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे मुलाखतींचा कार्यक्रमही राबविला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. शक्तिप्रदर्शनाबरोबरच उमेदवारी मिळावी यासाठी अनेक खटाटोपही उमेदवारांकडून करण्यात आले. स्वतंत्र लढण्याची चाचपणी झाल्यानंतर या सर्वानाच उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार, याची उत्सुकता लागली होती. येत्या २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत ही मुदत आहे. आघाडी आणि युती करण्याबाबतच्या चर्चा सुरु झाल्यामुळे उमेदवार याद्या लांबणीवर पडल्या आहेत.

शहरातील ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. आता एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये जागा वाटपाचे प्रस्ताव एकमेकांना देण्यात आले आहेत. तर भाजप-सेनेमध्ये प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये जागा वाटपाचा प्रस्ताव सादर होणार आहे. आघाडी किंवा युती झाली तर काही जागा इतर पक्षांना सोडाव्या लागणार आहेत. कोणत्या जागा सुटतील, कोणत्या राहतील, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

चार सदस्यीय प्रभागांमुळे मिळालेली निवडणूक लढवण्याची संधी त्यातून गमवावी लागणार असून पुन्हा पाच वर्षे थांबण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. त्यामुळे युती किंवा आघाडी नकोच, अशीच सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. सध्या प्राथमिक चर्चा सुरु झाली असून आणखी तीन-चार फेऱ्या होणार असल्यामुळे यादीची प्रतीक्षा उमेदवारांना करावी लागणार आहे.