‘विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आदल्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका आल्या..महाविद्यालयातील स्थानिक चौकशी समितीचा अहवाल तसाच आला. अशा अनेक आख्यायिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रसिद्ध आहेत. या सगळ्याला जणू पुष्टी देण्यासाठी विद्यापीठाने वार्षिक अहवालात आदल्या वर्षीचीच पाने जोडली आहेत. इतकेच नाही तर या पानांवरील वर्ष बदलण्याचीही तसदी घेतलेली नाही.
विद्यापीठाचा अर्थसंकल्प आणि २०१४-१५ चा वार्षिक अहवाल नुकताच मंजूर झाला. मात्र या वार्षिक अहवालात अनेक पाने आदल्या वर्षीचीच (२०१३-१४ या शैक्षणिक वर्षांची) जोडण्यात आली आहेत. इतकेच नाही तर आदल्या वर्षीच्या अहवालाची ‘कॉपी’ करताना त्यात शैक्षणिक वर्ष बदलण्याची काळजीही विद्यापीठाने घेतलेली नाही. वार्षिक अहवालात विद्यापीठाने वर्षभरात केलेली कामे, अहवाल, काही धोरणे, निर्णय यांबरोबरच दिलेल्या पदव्या, महाविद्यालयांची संख्या, शिक्षकांची मान्यता अशी माहिती उपलब्ध असते. मात्र अद्ययावत माहिती देण्याची तसदीच विद्यापीठाने घेतलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाची जुनीच सांख्यिकी माहिती या अहवालातून मिळते.
जे शैक्षणिक वर्ष सुरू असेल, त्याच्या आदल्या वर्षीचा अहवाल सादर होत असतो. त्यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांचा अहवाल विद्यापीठाने जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थिसंख्या, पदव्यांची संख्या, मान्यताप्राप्त शिक्षक, महाविद्यालये यांची सांख्यिकी माहिती आणि तपशील मिळवण्यासाठी विद्यापीठाला एक वर्षांचा कालावधी असतो. विद्यापीठाने अहवालात मात्र अद्ययावत गोष्टी दिल्या नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आकडेवारी आणि तपशिलातही फरक दिसत आहे. अहवालांत महाविद्यालयांची यादी आणि प्राचार्याचे संपर्क क्रमांक दिले जातात. मात्र दरम्यानच्या एका वर्षांत काही महाविद्यालये बंद झाली, तर काही नवी सुरू झाली. मात्र बंद झालेली महाविद्यालयेही दिसत आहेत. व्यवस्थापन परिषद आणि त्यानंतर अधिसभेत अहवाल मंजूर केला जातो. मात्र अर्थसंकल्प आणि वार्षिक अहवाल यांवर आक्षेप घेण्यासाठी मुळातच या वेळी अधिकार मंडळावर सदस्यच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे कोणताही आक्षेप न येता चुका असलेला हा अहवाल मंजूरही झाला आहे.