भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह भीमा-कोरेगाव येथील ग्रामस्थांविरुद्ध येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भटक्या विमुक्त जात जमाती संघटनेच्या सरचिटणीस सुषमा अंधारे (वय ३५, रा. सध्या लक्ष्मी नारायण वसाहत, नीलायम चित्रपटगृहानजीक, सदाशिव पेठ, मूळ रा. परळी वैजनाथ, जि. बीड) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे आणि भीमा-कोरेगावमधील रहिवासी योगेश गव्हाणे, गणेश फडतरे यांच्यासह आठशे ते एक हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मी निघाले होते. माझ्यासोबत मिलिंद जगताप, अ‍ॅड. तुषार खंदारे, गौतम चव्हाण, कविता पवार, जयश्री जाधव होते. नगर रस्त्यावरील सणसवाडी भागात घोषणा देत आलेल्या जमावाने आमच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्या वेळी मोटारीतील दोघींना दगड लागले. त्यांना तातडीने शिक्रापूर भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले, असे अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मेवाणीविरुद्ध आलेल्या तक्रारीची पडताळणी’  

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी नेता उमर खालीद यांनी शनिवारवाडय़ावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अर्ज डेक्कन पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. तक्रारअर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. मेवाणी आणि खालीद यांनी केलेल्या भाषणाचे ध्वनिचित्रफीत पडताळण्यात येत आहे.