खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वाहतूक शाखेतील एका ४२ वर्षीय करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा गुरुवारी (२१ मे) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. लष्करी सेवेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेतून ते पोलीस दलात दाखल झाले होते. ही घटना समजल्यानंतर शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

या घटनेत मृत्युमुखी पडलेले पोलीस कर्मचारी वाहतूक विभागात नेमणुकीस होते. शहराच्या पूर्व भागात ते वाहतुकीचे नियमन गेल्या काही दिवसांपासून करत होते. त्यांना संसर्गाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर ८ मे रोजी त्यांची तपासणी करण्यात आली होती. करोना चाचणीत ते बाधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्यांना  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.  ते मूळचे सातारा जिल्ह्य़ातील आहेत. लष्करी सेवेतील कालावधी पूर्ण केल्यानंतर ते पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांनी अठरा वर्ष लष्करात सेवा बजावली होती. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. यापूर्वी शहरात मध्य भागातील एका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहायक फौजदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

शहर पोलीस दलात २२ बाधित

शहरात करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर गेले दोन महिने रस्त्यावर उतरून काम करणारे पोलीस बाधित झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहर पोलीस दलातील २२ कर्मचारी करोनाबाधित  झाले आहेत. त्यापैकी दहा जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. पोलिसांना करोनाचा संसर्गाला अटकाव घालण्यासाठी साधने पुरविण्यात आली आहेत. स्वत:ची तसेच कुटुंबीयांची काळजी घेण्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून त्यांना मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे.