‘सीम स्वॉपिंग’चा आणखी एक गुन्हा दाखल

पुणे : सीमकार्ड अद्ययावत करण्याच्या बतावणीने लष्कर भागातील एकाला चोरटय़ाने ११ लाख १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. दोन महिन्यांपूर्वी कोथरूड भागातील एकाकडे अशाच प्रकारची बतावणी करून चोरटय़ाने १८ लाख रुपयांचा गंडा घातला होता.

याबाबत एका ५७ वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार लष्कर भागात वास्तव्यास आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ाविरोधात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी तक्रारदारांच्या मोबाइल क्रमांकावर चोरटय़ाने संपर्क साधला होता. एका मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरटय़ाने केली होती. सीमकार्ड अद्ययावत करायचे आहे, असे तक्रारदाराला सांगण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदाराने चोरटय़ावर विश्वास ठेवला. चोरटय़ाने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर  एक संदेश पाठविला. हा संदेश पुन्हा चोरटय़ाने ‘१२३५४’ या क्रमांकावर पाठविण्यास  सांगितला. त्यानंतर चोरटय़ाने तक्रारदाराच्या मोबाइल खात्यातील गोपनीय माहिती चोरली. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकाची जोडणी  बँक खात्याला करण्यात आली होती. तक्रारदाराने संदेश पाठविल्यानंतर लगोलग त्यांच्या खात्यातून ११ लाख १७ हजार ५२८ रुपये चोरटय़ाने लांबविले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे अर्ज दिला. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित तपास करत आहेत.

सावध राहण्याचे आवाहन

मोबाइल कंपनीकडून बोलत असल्याची बतावणी तसेच मोबाइल संभाषण, अन्य त्रुटी दूर करण्यासाठी सीमकार्ड अद्ययावत करण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे लांबविण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाइल क्रमांकावर एखाद्या अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास किंवा त्याने मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केल्यास नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. प्रतिसाद दिल्यास आर्थिक फटका बसू शकतो. अशा प्रकारे एखाद्याने संपर्क साधल्यास त्वरित मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे किंवा बँकेत संपर्क साधावा. बँक खात्याशी जोडणी केलेला मोबाइल क्रमांक बदलून घ्यावा तसेच पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फसवणूक अशी होते

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली जाते. संभाषणातील त्रुटी (कॉल ड्रॉप), इंटरनेटचा वेग आदी त्रुटी दूर केल्या जातील. त्यासाठी फक्त सीमकार्ड अद्ययावत करावे लागेल, असे चोरटय़ांकडून सांगितले जाते. त्यानंतर चोरटा मोबाइल क्रमांकावर एक २० अंकी सीमकार्ड क्रमांक असलेला संदेश पाठवितो. हा संदेश पुन्हा १२३५४ या क्रमांकावर पाठविण्यास सांगितले जाते. संदेश पाठविल्यानंतर लगेचच सीमकार्ड बंद पडते. ज्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर चोरटय़ाकडून संपर्क साधण्यात आला असेल तो क्रमांक आपोआप चोरटय़ाकडील सीमकार्डवर सुरू होतो. त्यानंतर बँकेकडून येणाऱ्या संदेशाचा गैरवापर करून चोरटा बँक खात्यातून पैसे काढून घेतो.