12 December 2017

News Flash

पुण्यातील संगणक अभियंता अंतरा दासच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस

आठ महिन्यानंतरही मारेकरी मोकाट

पिंपरी-चिंचवड | Updated: August 11, 2017 6:22 PM

मृत संगणक अभियंता अंतरा दास

पुण्यातील संगणक अभियंता अंतरा दास (वय २३) हिच्या हत्येला ८ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही तिचा मारेकरी अद्यापही मोकाट आहे. ८ महिन्यांत पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना तिच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी २५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. मारेकऱ्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरी या प्रकरणाच्या तपासामध्ये वेग येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मूळची पश्चिम बंगाल येथील व नोकरीनिमित्त निगडी येथे राहणाऱ्या अंतराचा २३ डिसेंबरला तळवडे येथे धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. हा खून एकतर्फी प्रेमातून झाला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अंतराचा मित्र संतोष कुमार (वय २४, रा. बिहार) याला अटक केली. पण ९० दिवस उलटून ही चार्ज शीट दाखल न झाल्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला होता. संतोष कुमारला जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले होते.

अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला होता. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणा-या सत्येंद्र यांनी तिला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

येथे माहिती द्या

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा- दूरध्वनी क्रमांक- ९४२३८८४७४५,९४२०८२७००१,९९२३४८१२३५,९८२३२३२४२१ 

 

 

First Published on August 11, 2017 6:22 pm

Web Title: antara das murder case pune police 25 thousand reward for information about the murderer