राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि पुणे महापालिकेचे सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी बुधवारी छापा टाकला. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती आढळून आल्यामुळे जगताप यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे लाखो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात जगताप यांच्याकडे सन २००७-०८ मध्ये ३४,१७,७७६ रुपये, २००८-०९ मध्ये १८,१४,३२६ रुपये, २००९-१० मध्ये १, ६५,३८९ रुपये आणि २०१२-१३ मध्ये ४६,१४,७२२ रुपये इतकी बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी जगताप यांची पत्नी आणि नगरसेविका उषा जगताप यांच्याविरुद्धही बेहिशेबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी या दोघांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.