महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका जयश्री मारणे यांच्या संपत्तीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोपनीय चौकशी सुरू केली आहे. जयश्री या कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी असून लोकसेविका असल्यामुळे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी सूचना पुणे पोलिसांकडून करण्यात आल्यानंतर गोपनीय चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
गजा मारणे टोळीने नीलेश घायवळ टोळीतील दोन गुंडांची हत्या केल्यानंतर या टोळीची दहशत निर्माण झाली होती. टोळीयुद्ध शहराच्या मध्य भागापर्यंत येऊन पोहोचले होते. पोलिसांनी मारणेच्या चहूबाजूंनी नाडय़ा आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या टोळीवर शहर व ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. मारणे हा सध्या पोलीस कोठडीत आहे. गजा मारणेकडे मोठी मालमत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गजा मारणेची पत्नी या लोकसेविका असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून मालमत्ता बेनामी आहे अथवा नाही हे जाणून घेण्यासाठी शहर पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी पत्रव्यवहार करून चौकशी करण्याची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांगितले, की पुणे पोलिसांनी पत्र पाठवून लोकसेविका जयश्री मारणे यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गजा व रूपेश मारणेच्या कोठडीत वाढ
दरम्यान, नीलेश घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे याच्या खूनप्रकरणात गजा मारणे व रूपेश मारणे या दोघांच्या कोठडीत २८ डिसेंबपर्यंत वाढ करण्याचा आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिला. या दोघांकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. या गुन्हय़ातील आणखी एक पिस्तूल जप्त करण्यासाठी व इतर तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती ती न्यायालयाने मान्य केली.