अनुपम खेर यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) अध्यक्ष म्हणून यापूर्वी सेवानिवृत्त व्यक्तींनी काम पाहिले आहे. मी चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रात व्यग्र आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली म्हणजे मला तुमच्या डोक्यावर येऊन बसायचे नाही, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते आणि एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. उलट माझ्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच संस्थेला भेट देण्यासाठी सोमवारी पुण्यात आलेल्या खेर यांनी ‘मास्टर क्लास’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अभ्यासक्रमाला विरोध असलेल्या विद्यार्थ्यांशीही खेर यांनी चर्चा केली.

चंदीगड येथील इंडियन थिएटरमध्ये एक वर्ष, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयामध्ये (एनएसडी) तीन वर्षे आणि त्यानंतर सहा महिने मी पुण्यामध्ये होतो. लखनौ येथे माझी पहिली नोकरी शिक्षकाची होती. काम मिळण्यापूर्वी तीन वर्षे मी रस्त्यावरून फिरत होतो. गेली ३३ वर्षे चित्रपटसृष्टीमध्ये पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अजूनही चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रात मी कार्यरत आहे. हा अनुभव मी विद्यार्थ्यांना सांगितला, असे खेर यांनी ‘मास्टर क्लास’बद्दल सांगितले.

ज्याला काम करायचे आहे तो वेळ काढतो. मी सक्रिय आहे. जेवढा माझा अनुभव समृद्ध होईल त्याचा विद्यार्थ्यांनाच फायदा होईल. मी आशावादी आहे. त्यामुळे येथील प्रश्नांवर मार्ग काढण्यात येईल. मी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधू शकतो. त्यासाठी मला माध्यमांच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही.

प्रश्न आहे असे समजण्यापेक्षाही मी उत्तराच्या माध्यमातून त्याकडे पाहतो. मी प्रशासन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी अशा सर्व घटकांशी संवाद साधला असून सर्वाच्या समस्या चर्चेतून सोडविल्या जातील, असे खेर यांनी स्पष्ट केले.

अभ्यासक्रमाविषयी आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही प्रश्नांसंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातून योग्य मार्ग निघेल, असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher relief ftii students
First published on: 18-10-2017 at 06:09 IST