निसर्गकन्यांच्या जीवनातील आनंदकण कुंचल्यातून रेखाटत वैशिष्टय़पूर्ण शैलीचा आविष्कार घडविणाऱ्या अनुराधा ठाकूर यांचे ‘एथनीक सेरेन्डीपीटी’ हे चित्र पंतप्रधान कार्यालयात झळकले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या स्पर्धेत अनुराधा ठाकूर यांच्या या चित्राची निवड झाली असून हे चित्र नुकतेच पंतप्रधान कार्यालयात लावण्यात आले आहे.
अनुराधा ठाकूर या मूळच्या नगरच्या. गेली अनेक वर्षे त्या कॅनव्हासवर भारतातील आदिवासी जीवनशैली आविष्कृत करीत आहेत. आदिवासींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी भेट देत त्या त्या भागामध्ये सामाजिक काम करणाऱ्या लोकांसमवेत स्थानिक आदिवासींचे सांस्कृतिक जीवन त्यांनी अनुभवले. हे आदिवासींच्या जीवनातील सार त्यांनी कुंचल्याच्या माध्यमातून चित्रांमध्ये सहजतेने उतरवले आहे. मात्र, आता ‘एथनीक सेरेन्डीपीटी’ या चित्रामुळे अनुराधा ठाकूर यांनी थेट दिल्ली दरबार सर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या या चित्राविषयी माहिती देताना अनुराघा ठाकूर म्हणाल्या, गुजरातमधील कच्छ परिसरातील राबारी या जमातीच्या जीवनातील आनंदक्षण मी या चित्रातून आविष्कृत केला आहे. लग्नसमारंभातील लगबग आणि वधू-वरांकडील प्रमुखांचा आनंद या चित्रामध्ये रेखाटला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ‘आनंदानं जगणं’ ही निसर्गाने दिलेली शिकवण मी व्यक्तिगतरीत्या अनुभवली. आणि मग कॅनव्हासवरील ही अभिव्यक्ती साकारली गेली. काळ्या ठसठशीत रेषा आणि त्यांना पूरक काळ्या आकारांचे संयोजन या चित्रामध्ये दिसते. या सुबक रेषांतून आणि त्यांच्या आकारातून त्यांच्या जीवनातील पारदर्शकता सांगत असतानाच एका वेगळ्या पातळीवर नेणाऱ्या चित्रातील रंगांना एक वेगळा अर्थही दिसतो. दैनंदिन जीवनातील संघर्षांवरचा उतारा म्हणजे सणसमारंभांच्या उत्सवी आनंदातून ते मिळवितात. हे आनंदाचे रंगही या चित्रांमध्ये अधोरेखित झालेले दिसतात. आपली माती, या मातीचा अनुभव, त्या जगण्याचे प्रतििबब दाखविणारे हे चित्र आपल्या मातीचा गंध आणि वारसा सांगत पंतप्रधान कार्यालयामध्ये झळकले याचा आनंद आणि अभिमानही वाटतो.