विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना खऱ्या अर्थाने निर्भया करण्यासाठी पोलिसांनी ‘प्रतिसाद’ हे अॅप तयार केले असून त्याला विद्यापीठानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे अॅप घेण्याबाबत मुलींना माहिती देण्यात येत आहे.
विद्यापीठाचे आवार तसे शांत. विद्यापीठाकडून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत असली, तरी गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठात घडलेल्या घटनांमुळे विद्यार्थिनी किती सुरक्षित आहेत असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. विद्यार्थिनींच्या किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी एक अॅप्लिकेशन तयार केले असून विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाकडूनही या अॅपची माहिती विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
एखादी अडचण आल्यास या अॅपच्या माध्यमातून पुणे पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीने घटनास्थळावर पोहोचणेही सोपे होणार आहे. ‘युनिक गार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ कडून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हे मोफत अॅप डाऊनलोड केल्यानंतर छायाचित्र, नाव, मोबाईल क्रमांक, रक्तगट, मेल अॅड्रेस, नातेवाइकांची माहिती नोंदवायची आहे. संकटकाळांत या अॅपवरील बटन दाबल्यास विद्यार्थिनींची सर्व माहिती, ती उपस्थित असलेले ठिकाण याची माहिती पोलिसांकडे जाते. प्राथमिक माहिती हाती आल्यामुळे पोलिसांना पुढील कार्यवाहीची दिशा ठरवणे सोपे जाते.
या अॅपचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी वापर करावा यासाठी विद्यापीठाकडून जागृती मोहीम करण्यात येत आहे. विद्यापीठाचे विभाग, महाविद्यालये यां ठिकाणी विद्यापीठाने पत्रं पाठवली आहेत. निर्भया अभियानाच्या माध्यमातून साधारण ४०० महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांच्या माध्यमातूनही या अॅपबाबत जागृती करण्यात येईल असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.