पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी महाविकास आघाडी आणि मनसे या प्रमुख पक्षांसह अनुक्रमे १०८ आणि ६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दोन्ही मतदार संघांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत गुरुवारी (१२ नोव्हेंबर) संपली. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) दाखल अर्जाची छाननी होणार असून त्यामध्ये किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात हे समजणार आहे.

पुणे पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड, रयत क्रांती संघटनेकडून प्रा. एन. डी. चौगुले, तर शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडी कडून प्रा. जयंत आसगावकर, मनसेकडून विद्याधर मानकर या प्रमुख पक्षांसह इतर पक्ष व अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदार होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने पदवीधरसाठी तब्बल ७१, तर शिक्षकसाठी ५१ उमेदवारांनी अर्ज दाखल के ले. विधान भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारांच्या समर्थकांनी भवनाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी देखील गर्दी केली होती. त्यामुळे सुरक्षित अंतर नियमाचे पालन झाले नाही.

महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी?

पुणे पदवीधर मतदार संघासाठी भाजपकडून संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. एन. डी. चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवारी मागे घ्यायची किं वा कसे? याबाबतचा निर्णय घेऊ, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीकडून अरुण लाड हे अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादीच्या भय्या माने यांनी देखील अर्ज दाखल केला आहे.