सार्वजनिक वाहतुकीसह शहरासमोर असलेले सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी कोणतेही विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यांचे प्रशासनावरील नियंत्रणही सुटलेले आहे. त्यामुळे शहराच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती करावी आणि विद्यमान आयुक्तांना फक्त स्मार्ट सिटी अभियानाचे काम द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले असून ही मागणी मान्य न झाल्यास मनसेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शहराला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. ते सोडवण्याचे काम आयुक्तांनी करावे तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे. मात्र शहरासमोरच्या प्रश्नांबाबत आयुक्त कोणत्याही माध्यमातून प्रयत्न करत नसल्याचेच दिसत आहे, अशी तक्रार मनसेने केली आहे.
शहराच्या वाहतूक प्रश्नाकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले असून शहरातील बीआरटी, पीएमपी, सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग यांचा बोजवारा उडाला आहे. चालू वर्षांपासून प्राथमिक शिक्षणाची सर्व जबाबदारी महापालिकांकडे सोपवण्यात आली असली, तरी महापालिका प्राथमिक शाळांमध्ये शाळांच्या पहिल्या दिवसापासूनच गोंधळाचे वातावरण आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या तसेच  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळेही या गोंधळात भर पडला. शिक्षण मंडळातील अनेक उपक्रमही बंद पडले आहेत. शिक्षकांची वर्गावरील उपस्थितीही कमी झाली आहे. महापालिकेचा असा कारभार पाहता सध्याच्या आयुक्तांना फक्त स्मार्ट सिटी अभियानाचे काम द्यावे आणि शहराच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक व नित्य कामकाज यासाठी वेगळ्या आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या मागणीचे निवदेन मनसेतर्फे महापौरांनाही देण्यात आले आहे.