मागील चांगल्या रेकॉर्डच्या आधारेच अभिषेक गुप्ता यांची पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. पुण्यात पत्रकारांशी वर्तालापात ते बोलत होते.

देशमुख म्हणाले, “माजी मुख्य सचिव अभिषेक गुप्ता यांच्याकडून करोना काळात खूप मोठी चूक झाली. त्याबद्दल त्यांना शिक्षा देखील मिळाली आहे. त्यांचं मागील रेकॉर्ड बघता ते चांगले अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची पुणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.”

करोना लॉकडाउनच्या काळात सर्वकाही बंद असताना व्यावासायिक बाधवान कुटुंब हे मुंबईहून महाबळेश्वरला मंत्रालयातून विशेष परवानगीने दाखल झाले होते. ही परवानगी राज्याचे तत्कालीन गृहखात्याचे प्रधान सचिव असलेल्या अभिषेक गुप्ता यांच्या सहीने देण्यात आली होती. त्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं होतं. यामुळे गृहखात्याला अभिषेक गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई देखील करावी लागली होती.

या पार्श्वभूमीवर गुप्ता यांची नुकतीच पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही नियुक्ती म्हणजे अभिषेक गुप्ता यांचं पुनर्वसन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.