एकीकडे आयपीएलसारख्या स्पर्धांवर आणि क्रिकेटपटूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना इतर खेळाडूंकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१७ मध्ये न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड मास्टर गेम्समध्ये ट्रिपल जम्प या प्रकारात भारताचे नेतृत्व करणाऱ्या पराग पाटील या खेळाडूकडे शासन व्यवस्थेचे लक्ष नाही.

पिंपरी-चिंचवड येथील ३५ वर्षीय पराग यांनी या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. मात्र स्पर्धेदरम्यान त्यांच्या गुडघ्याच्या झालेल्या दुखापतीवरील उपचाराचा खर्च करण्यास शासन तयार नाही. न्यूझीलंडमधील स्पर्धेत लांब उडीच्या प्रकारात खेळ सादर करताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविण्यात आले. दुखापत झालेल्या पायाची हालचाल करण्यासाठी डॉक्टरांनी बंदी घातलेली असतानाही त्यांनी ट्रिपल जम्प या दुसऱ्या क्रिडा प्रकारात सहभाग नोंदवत रौप्यपदक मिळविले. परागच्या या कामगिरीची ना शासनाने दखल घेतली ना प्रशासनाने.

आजपर्यंत पाटील यांनी भारतासाठी तब्बल ११ पदके मिळवली असून त्यातील ८ पदके ही परदेशात झालेल्या स्पर्धांतून मिळविली आहे. इतकी चांगली कामगिरी करूनही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून पराग पाटील यांच्या कामगिरीकडे लक्ष दिले गेले नाही. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अनुदानाविना या सर्व स्पर्धेत पाटील यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांना या स्पर्धेला जाण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये हे मोजावे लागले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडेही वारंवार आर्थिक मदतीसाठी पाठपुरवठा केला असत तुमचे वय जास्त असल्याने तुम्हाला मदत मिळू शकत नाही असे उत्तर यंत्रणेकडून देण्यात येत आहे.