कात्रज, निगडी, वाघोली, पिरंगुट, लोणी काळभोपर्यंत मेट्रो

पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) राबवण्यात येणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दोन मार्गिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या एक मार्गिका अशा तीन मार्गिकांच्या विस्तारीकरणाला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. वनाजच्या बाजूला चांदणी चौकापर्यंत, रामवाडीच्या बाजूला वाघोलीपर्यंत, पिंपरीच्या बाजूला निगडीपर्यंत, तर स्वारगेटच्या बाजूला कात्रजपर्यंत असे नवे विस्तारित मार्ग राहणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग हिंजवडीच्या बाजूला पिरंगुटपर्यंत वाढवण्यात येणार असून शिवाजीनगरपासून हडपसरमार्गे लोणी काळभोर-कदमवाक वस्तीपर्यंत पीएमआरडीएची मेट्रो धावेल.

महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्या मेट्रो प्रकल्पांबाबतच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या सूचना केल्या. ते म्हणाले, वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिका वनाजच्या बाजूला चांदणी चौकापर्यंत आणि रामवाडीच्या बाजूला वाघोलीपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मार्गिका  वाघोली ते चांदणी चौक अशी होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे आल्यानंतर मान्यता देण्यात येईल. तसेच पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचा पिंपरीच्या बाजूला निगडीपर्यंत आणि स्वारगेटच्या बाजूला कात्रजपर्यंत विस्तार केला जाईल. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका करण्यात येत आहे. या मार्गिकेचा हिंजवडीच्या बाजूला पिरंगुटपर्यंत आणि शिवाजीनगरपासून हडपसरमार्गे लोणी काळभोर-कदमवाक वस्तीपर्यंत विस्तार होईल. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो माण-हिंजवडी ते शिवाजीनगर संबोधण्यात यावी, असे निर्देश दिले. मेट्रो प्रकल्पाच्या जमिनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए यांच्या विकास योजना आराखडय़ात दर्शवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मेट्रोच्या नावात पिंपरीचाही समावेश

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाला केवळ पुण्याचे नव्हे, तर पिंपरी-चिंचवडचेही नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत अजित पवार यांनी घेतली आहे. पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचाही समावेश असेल, असे त्यांनी जाहीर केले. स्वारगेट ते हडपसर मार्गिकेबाबत टाटा सिमेन्स आणि महामेट्रो यांची भिन्न मते आहेत. दोघांनीही एकत्र अभ्यास करून अहवाल देण्यास सांगितले. ही मार्गिका भुयारी करायची झाल्यास येणाऱ्या खर्चाची मानसिकता आम्ही ठेवली आहे. वारजे ते खडकवासला मेट्रोबाबतही अभ्यास करण्यास सांगितले, असेही पवार यांनी सांगितले.

विस्तारासाठी पाच हजार कोटींची आवश्यकता

महामेट्रो आणि पीएमआरडीएकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी राज्य सरकारचा २० टक्के हिस्सा उपलब्ध करून देऊ, असे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. शिवाजीनगर येथील गोदाम वडाची वाडी येथे स्थलांतरित होणार. तसेच राजीव गांधी वसाहत आणि कामगार पुतळा येथील ५१८ झोपडय़ा बाधित होत आहेत. तेथील रहिवाशांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनांत करावे. मेट्रोसाठी आवश्यक जागा शासकीय जागा देण्याबाबत पुढील बैठक घेऊ. विस्तारित नव्या मार्गाचे काम पीएमआरडीएने ‘पीपीपी’ तत्त्वावर करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.