शुल्कवाढ मागे घेण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी एम.आय.टी संस्थेच्या तीन शाळांची मान्यता काढून घेण्याची शिफारस शासनाकडे करण्यात यावी, असे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
एमआयटी संस्थेच्या ‘सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल’, ‘स्वामी विवेकानंद प्रायमरी स्कूल’ आणि ‘एमआयटी प्रायमरी स्कूल’ या तीन शाळांनी नियमबाह्य़ पद्धतीने शुल्कवाढ केल्याच्या तक्रारी पालकांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून पालक आणि शाळेत याबाबत वाद सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून वर्षभरात या शाळांना शुल्कवाढ रद्द करण्यासंदर्भात सहा वेळा पत्रे देण्यात आली. मात्र या शाळांनी शुल्कवाढ कायम ठेवली. विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचीही पालकांची तक्रार आहे. नियमानुसार १५ टक्के शुल्कवाढ करण्यासाठीच परवानगी असताना या शाळांनी २५ टक्के शुल्कवाढ केली. शाळेत नियमानुसार शुल्क भरण्याची भूमिका घेऊन पालकांनी उपसंचालक कार्यालयांत ‘शुल्क भरा’ आंदोलन केले. या वेळी उपसंचालक कार्यालयांत पालकांनी शुल्काचे धनादेश जमा केले. या वेळी शाळेला आदेश देऊनही शाळेने नियमबाह्य़ शुल्कवाढ कायम ठेवल्याप्रकरणी शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस करण्याचे आदेश जाधव यांनी दिले.