लहान बालके दत्तक देणाऱ्या ‘सोफोश’ या मान्यताप्राप्त संस्थेची मान्यता गेल्या महिन्यात संपल्यामुळे संस्थेतर्फे केली जाणारी दत्तकविधान प्रक्रिया महिनाभर केवळ एका सहीच्या प्रतीक्षेत रखडली होती. अखेर मंगळवारी हा मुद्दा निकाली निघाला असून संस्थेच्या मान्यतेच्या नूतनीकरणावर महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्तांची सही झाल्याचे समजते. गेला महिनाभर थांबलेल्या आणि लहानग्यांना दत्तक घेण्यासाठी आसुसलेल्या पालकांना यामुळे मोठाच दिलासा मिळाला आहे.
 दत्तकविधान करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना ही मान्यता महिला व बाल विकास विभागातर्फे दिली जाते. सोफोशची मान्यता जानेवारी २०१४ च्या मध्यावर संपली. मात्र संस्थेने सुमारे ९ महिने आधीपासूनच मान्यतेच्या नूतनीकरणासाठीची प्रक्रिया सुरू केली होती, असे समजते. मान्यता संपून महिना उलटून गेल्यावरही नूतनीकरण रखडल्यामुळे संस्थेतील बाळे दत्तक देण्याची प्रक्रिया या काळात ठप्प झाली होती.
बाळ दत्तक घेण्यास उत्सुक असणाऱ्या काही पालकांनी ‘लोकसत्ता’ कडे आपली व्यथा मांडली होती. संस्थेतून बाळ दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना बाळ प्रत्यक्ष दाखवण्यापूर्वी एक ते दीड वर्षांच्या प्रक्रियेतून जावे लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून बाळाला घरी न्यायला पूर्णत: तयार असलेल्या पालकांनाही संस्थेच्या मान्यतेच्या नूतनीकरणाअभावी विनाकारण थांबावे लागत होते. बाळ पाहून त्याचा लळा लागला असूनही ते प्रत्यक्ष घरी नेता येत नसल्यामुळे हे पालक चिंतित होते. तसेच बाळ दाखवण्याची प्रक्रियाही मान्यता रखडल्याच्या काळात अडली होती.
बाल कल्याण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे म्हणाले, ‘‘सोफोशच्या मान्यतेच्या नूतनीकरणाबद्दल आयुक्तांकडून सही झाली आहे. या नूतनीकरणाच्या प्रक्रियेत विभागाने काही प्रश्न उपस्थित केले होते, मात्र संस्थेने या प्रश्नांची उत्तरे सादर केल्यानंतर लगेच विभागाने पुढची पावले उचलली आहेत.’’
सोफोशच्या संचालक माधुरी अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘मंगळवारी संस्थेच्या मान्यतेच्या नूतनीकरणावर सही झाल्याचे समजले असून संस्थेच्या मान्यतेचे पुढील पाच वर्षांसाठी नूतनीकरण होण्याचे काम पार पडले आहे.’’

परदेशात मुली दत्तक जाण्याचे प्रमाण वाढले
‘सोफोश’ संस्थेतर्फे आतापर्यंत २ हजार ८९३ बालकांना दत्तक देण्यात आले आहे. गेल्या वर्षअखेपर्यंत १ हजार ५५३ मुली दत्तक गेल्या आहेत. आतापर्यंत ६५९ बालके परदेशामध्ये दत्तक गेली असून त्यामध्ये ४८१ मुली आहेत. सोफोश ही संस्था यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या संस्थेचा उपक्रम असलेल्या ‘श्रीवत्स बालसंगोपन’ केंद्रामार्फत गेली चार दशके निराधार मुलांचे संगोपन केले जात आहे. ती दत्तकही दिली जातात. १९७४ पासून गेल्या वर्षांअखेपर्यंत २ हजार ८९३ बालकांना दत्तक देण्यात आली, अशी माहिती संस्थेच्या संचालिका माधुरी अभ्यंकर यांनी दिली. भारतामध्ये दत्तक गेलेल्या बालकांपैकी १ हजार १६२ मुलगे तर, १ हजार ७२ मुली आहेत. परदेशामधील दांपत्ये दत्तक घेताना मुलींना प्राधान्य देतात. संस्थेने या केंद्रामार्फत आतापर्यंत सहा हजार बालकांचे संगोपन केले आहे. यामध्ये अपघातामध्ये जखमी झालेल्या पालकांच्या अपत्यांसह अल्प काळासाठी संगोपन करावे लागणाऱ्या बालकांचाही अंतर्भाव आहे. सध्या या केंद्रामध्ये ६८ बालके असल्याची माहिती अभ्यंकर यांनी दिली.